मुंबई : तुर्कस्थान येथे गतवर्षी झालेल्या जागतिक शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पूर्णा रावराणेचा स्टार मल्ल नरसिंग यादवच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबई अॅथलेटिक्स स्पर्धांत कायम आपली छाप पाडणाऱ्या दहिसर येथील व्हीपीएम स्पोटर््स क्लबच्या २७व्या वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात नरसिंगची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी, क्लबच्या गुणवान खेळाडूंना नरसिंगच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जागतिक शालेय स्पर्धेत पूर्णाने गोळाफेक प्रकारात राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र, पदकाने तीला थोडक्यात हुलकावणी दिली. विशेष म्हणजे फारशा सुविधा नसतानाही पूर्णाने केवळ व्हीपीएम क्लबमधील कठोर सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय झेप घेत लक्षवेधी कामगिरी केली. त्याचप्रमाणे कॉसमॉस परेरा यांना व्हीपीएम भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवाय, राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्लबच्या एकूण १२ खेळाडूंनाही यावेळी गौरविण्यात आले. परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबची मुंबई उपनगरात प्रगती झाली, शिवाय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी क्लबचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)>सराव शिबिरामध्ये कठोर मेहनत घेणारे खेळाडूच यशस्वी होतात. आज क्रीडाविश्व पुर्णपणे बदलले असून यामध्ये कारकिर्द घडविण्याची मोठी संधी आहे. यशस्वी खेळाडूंना चांगल्या नोकरीसह अनेक पुरस्कारही पटकावण्याची संधी असल्याने खेळाडूंनी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावे. नियमित सराव आणि खेळातील शिस्त पाळली, खेळाडूंचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.- नरसिंग यादव
पूर्णा रावराणेचा नरसिंगकडून गौरव
By admin | Published: March 03, 2017 5:33 AM