हॅम्बर्ग : कंबरदुखी आणि सातत्याने थोडक्यात होणारे पराभव यामुळे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी गौरव बिधूडी याने आत्मविश्वास गमावला होता. परंतु, आता यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी एकमेव पदक निश्चित केल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला नवी उभारी मिळाली आहे. विशेष म्हणजे जुलै अखेरपर्यंत गौरवचा भारतीय संघात समावेश नव्हता. मात्र, आशियाई बॉक्सिंग संघटनेने त्याला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला. ही मिळालेली संधी साधताना गौरवने दिमाखदार कामगिरी केली.देशासाठी पदक निश्चित केल्यानंतर गौरवने म्हटले की, ‘जेव्हा मला वाईल्ड कार्ड मिळाल्याची माहिती मिळाली, तेव्हा मी प्रत्येक प्रशिक्षकाला याबाबत विचारत होतो. मी सर्वांना विचारत होतो आणि जेव्हा प्रत्येकाने ही खरी माहिती असल्याचे सांगितले तेव्हा मी नि:श्वास टाकला.गौरवने पुढे सांगितले की, ‘मी प्रत्येक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच हरलो. जागतिक स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार आले होते. पण, नंतर माझ्या मनात वेगळे विचार आले आणि मी हे चक्र तोडू शकतो असा विश्वास स्वत:ला दिला.’ त्याचप्रमाणे, ‘एका खेळाडूला आपल्या मनावर ताबा ठेवणे खूप कठीण असते. माझ्या डोक्यातही अनेक विचार येत होते,’ असेही गौरवने सांगितले.गौरव बिधूडीच्या आधी विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी कांस्य पटकावले आहे. गुरुवारी होणाºया लढतीत बाजी मारून या तिघांहून अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न गौरव करेल. ‘या कामगिरीमुळे याआधीच्या स्पर्धांमध्ये सातत्याने उपांत्यपूर्व फेरीत हरण्याचे दु:ख संपेल,’ असे गौरवने म्हटले.देशांतर्गत स्पर्धांमध्ये गौरव नेहमी चर्चाविषय ठरत असे. कारण, प्रत्येक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बाद होण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. तसेच, ताश्कंद आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी गमावली होती.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गौरव कांस्यपेक्षा अधिक वरचे पदक जिंकण्यात यशस्वी ठरला, तर अशी कामगिरी करणारा तो पहिला बॉक्सर ठरेल.
गौरवच्या कारकिर्दीला मिळाली नवी उभारी, जागतिक स्पर्धेतील यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 2:09 AM