नवी दिल्ली : माजी कर्णधार सुनील गावसकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बीसीसीआयच्या अंतरिम अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले. गावसकर यांना मार्च महिन्यात आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी कोर्टाने अंतरिम अध्यक्ष नेमले होते. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आयपीएल जूनमध्ये संपल्यामुळे गावसकर यांना जबाबदारीतून मोकळे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.मार्च महिन्यात दिलेल्या आदेशानुसार, बोर्डाचे उपाध्यक्ष असलेले शिवलाल यादव हे यापुढे बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष असतील. गावसकर यांनी काही दिवसांआधी न्यायालयाला पत्र लिहून अधिकार आणि कार्यभारासंदर्भात माझी स्थिती काय, हे निश्चित करण्याचा आग्रह केला होता, हे विशेष. न्यायालयाने आपल्याला आयपीएलच्या यशस्वी संचालनाची जबाबदारी सोपविली होती. स्पर्धा आता संपलेली आहे; त्यामुळे माझे काम काय हे कोर्टाने सांगावे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजीचा तपास करणाऱ्या न्या. मुद्गल समितीने बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावर ठपका ठेवला होता. चौकशी पूर्ण होईस्तोवर श्रीनिवासन यांनी पदावरून दूर व्हावे असेही सुचविले होते. श्रीनिवासन हे पदावरून दूर झाल्याने आयपीएल संचालनासाठी गावसकर यांची अंतरिम प्रमुखपदी कोर्टाने नियुक्ती केली होती. (वृत्तसंस्था)
गावसकर बीसीसीआय अंतरिम अध्यक्षपदाहून कार्यमुक्त
By admin | Published: July 19, 2014 1:58 AM