नवी दिल्ली : ईडन गार्डनवर १९ मार्चला खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाचे पारडे जड राहील, असे भाकीत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केले आहे.जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या भारतीय संघाचा सलामीलाच न्यूझीलंडने दारुण पराभव केल्याने फुगा फुटला होता. दुसरीकडे पाकने बांगलादेशवर शानदार विजय नोंदविला.या दोन्ही संघांबद्दल गावसकर म्हणाले, ‘न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर चांगली कामगिरी करण्याचे भारतावर दडपण असेल. पाक संघाने मात्र पहिला सामना जिंकल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशावेळी पाकला भारताविरुद्ध सामन्यात विजयाची अधिक संधी असेल. नेहमीप्रमाणे भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकची गोलंदाजी अशी ही लढत होणार आहे. भारतीय गोलंदाजांची अलीकडे फार चांगली कामगिरी झाली, हे खरे असले तरी आपल्या प्रेक्षकांपुढे विजयाचे दडपण घेऊन खेळताना कशी दाणादाण होते, हे नागपुरात पाहायला मिळाले. अश्विन चांगला मारा करीत असून, जसप्रीत बुमराह हा वेगवान माऱ्यात प्रभावी असल्याने पाकच्या फलंदाजांना लढत सोपी नाही.’आशिया चषकात वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर हा भारतासाठी डोकेदुखी ठरला होता. टी-२० विश्वचषकात भारतीय फलंदाज त्याचा मारा अचूकपणे खेळून काढण्यात यशस्वी होतील, अशी अपेक्षा गावसकर यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
भारताविरुद्ध पाकचे पारडे जड : गावसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 3:43 AM