जोहान्सबर्ग : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी जाहीर वेस्ट इंडीज संघातून ड्वेन ब्राव्हो आणि किरोन पोलार्ड या वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्यामुळे अनुभवी क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ आणि निवडकर्त्यांवर टीका केली आहे़दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळविल्यानंतर गेलने क्रिकेट मंडळ आणि निवड समितीवर संघनिवडीबाबत प्रश्न उपस्थित केला़ गेलने पुढे सांगितले, की वर्ल्डकपमध्ये आमचा संघ मजबूत दिसत असला, तरी वन-डेत केव्हा खेळाला कलाटणी मिळेल, हे सांगता येत नाही़ अशा वेळी हे दोन्ही खेळाडू संघात असते, तर आम्हाला मदतच झाली असती़ आता या खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघ फलंदाजीत दुबळा बनला आहे़ वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने शनिवारी वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे़ संघाच्या कर्णधारपदी जेसन होल्डर आणि मार्लोन सॅम्युअल्स याची उपकर्णधारपदी निवड केली आहे़ विशेष म्हणजे याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वन-डे मालिकेतही ब्राव्हो आणि पोलार्डचा विंडीज संघात समावेश करण्यात आला नव्हता़ (वृत्तसंस्था)
ड्वेन ब्राव्हो, पोलार्डला वगळल्याने गेल भडकला
By admin | Published: January 13, 2015 2:11 AM