नवी दिल्ली : जागतिक कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या गीता आणि बबिता या फोगाट भगिनींची मामेबहीण रितिका फोगाट हिने कुस्तीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने चक्क आत्महत्या केली. गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता. या स्पर्धेत रितिका अंतिम लढतीत एका गुणाने पराभूत झाली. हा पराभव तिला पचविता आला नाही. फोगाट भगिनींचे वडील व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगाट यांच्या अकादमीत रितिका प्रशिक्षण घेत होती. विशेष म्हणजे या सामन्यासाठी महावीर हेही उपस्थित होते. हरयाणातील चरकी दादरी या गावी परतल्यानंतर १५ मार्च रोजी रितिकाने गळफास घेतला. मूळची जयपूर ग्रामीण भागातील असलेली रितिका गेल्या पाच वर्षांपासून महावीर यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत होती.
गीता फोगाटच्या मामेबहिणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:10 AM