बोरडियोक्स (फ्रान्स) : यंदा युरो चषकाच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानण्यात येत असलेल्या विश्वविजेत्या जर्मनीसमोर शनिवारी उपांत्यपूर्व लढतीत लढवय्या इटलीचे आव्हान आहे. कडवा प्रतिस्पर्धी इटलीचा सांघिक खेळ निष्प्रभ करून उपांत्य फेरी गाठण्याचे उद्दिष्ट जर्मनीच्या मातब्बर संघाने ठेवले आहे.या सामन्यात जर्मनीला विजयासाठी पसंती देण्यात येत असली तरी या संघावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नक्कीच दबाव असेल. याला कारण इटलीचा शैलीदार आणि नियोजनबद्ध सांघिक खेळ. जगज्जेता जर्मनी आणि इटली हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ही लढत अटीतटीची ठरणार.जर्मनीने या स्पर्धेत आतापर्यंत अफलातून कामगिरी केली आहे. २०१४चा विश्वचषक जिंकणाऱ्या या संघावर अद्याप एकाही प्रतिस्पर्ध्याला गोल करता आलेला नाही. २ विजय आणि १ बरोबरी अशा कामगिरीसह हा संघ ‘क’ गटातून अव्वल स्थानी होता. त्यानंतर उपउपांत्यपूर्व लढतीत स्लोव्हाकियाचा ३-०ने धुव्वा उडवीत जर्मनीने अंतिम ८ मध्ये स्थान मिळवले.स्टार खेळाडूंचे फॉर्मात असणे हा जर्मनीसाठी सर्वांत मोठा प्लस पॉर्इंट आहे. यामुळेच संघाचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. प्रारंभीच्या लढतीत राखीव असलेला फॉरवर्ड मारियो गोमेझ याने मागील दोन लढतींत मिळालेल्या संधींचे सोने केले आहे. इटलीविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कर्णधार बॅस्टियन स्वेनस्टिगर दुखापतीतून सावरल्याने जर्मनीची ताकद वाढली आहे.
जर्मनीचे ‘टार्गेट सेमीफायनल’
By admin | Published: July 02, 2016 5:46 AM