जागतिक हॉकीवर एकेकाळी हुकमत गाजविलेल्या भारतीय संघाकडून यंदा आॅलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा केली जात आहे. त्यातच १९८०नंतर तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारताच्या महिला हॉकी संघाने आॅलिम्पिक पात्रता मिळविली. त्यामुळे साहजिकच भारतीयांना एकाच वेळी हॉकीमध्ये पुरुष व महिला संघाला प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने १९८० साली मॉस्को आॅलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाचे नेतृत्व केलेल्या एलिसा नेल्सन आणि त्यांच्या सहकारी खेळाडू सेल्मा डीसिल्व्हा यांनी या वेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन भारतीय महिलांना शुभेच्छा देताना सांगितले की, ‘‘मुलींनो, पदक मिळविण्यासाठी स्वत:ला झोकून द्या आणि जीव तोडून खेळा!’’ एलिसा आणि सेल्मा यांच्याशी साधलेला संवाद...पुन्हा एकदा भारताच्या महिला संघाला आॅलिम्पिकमध्ये पाहताना काय भावना आहेत? - आम्ही सर्व खेळाडू खूश आहोत. १९८०ची स्पर्धा आठवतेय, तेव्हा तिथे वेगवेगळ्या देशांचे खेळाडू पाहून भारावून गेलो होतो. ते अनुभव शब्दांत मांडू शकत नाही. आॅलिम्पिक पात्रता मिळवणं हीच गर्वाची बाब असते. इतक्या वर्षाने का होईना पण आपण पात्र तर ठरलो, हेदेखील एक यश आहे.आॅलिम्पिकसाठी महिलांना इतकी वर्षे वाट कशामुळे बघावी लागली?- यासाठी अनेक कारणं आहेत. आॅलिम्पिक पात्रतेच्या पद्धतीही यासाठी कारणीभूत आहेत. आता आशियाई स्पर्धा जिंकली तर थेट प्रवेश मिळतो. शिवाय खेळही खूप बदलला आहे. पूर्वीचा तंत्रशुद्ध खेळ खूप मागे पडला आहे. अॅस्ट्रोटर्फवर तंत्रशुद्ध खेळाच्या तुलनेत वेग आणि ताकद उपयोगी पडते. यामुळे भारताला फटका बसला. नियम बदलले, खेळाचे स्वरूप बदलले. यामुळे आपल्याला स्थिरावण्यास वेळ लागला. आपल्याकडे तंत्रशुद्ध पारंपरिक खेळ खेळला जात असल्याने टर्फवर जुळवून घेण्यास वेळ लागला; शिवाय पुरेपूर साहित्याची आपल्याकडे कमतरता अजूनही भासते. ते सर्वप्रथम दूर करणे आवश्यक आहे. हॉकी निश्चित महागडा खेळ आहे. जर यामध्ये यश मिळवायचे असेल तर तुम्हाला योग्य साहित्य मिळणे गरजेचे आहे.१९८० साली भारताच्या पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले होते. कसा होता तो अनुभव?- त्या वेळी आम्ही प्रत्येक सामन्यात पुरुषांना पाठिंबा दिला होता. जेव्हा त्यांनी गोल्ड जिंकले तेव्हा ते आम्हीच जिंकल्याचे वाटत होते. सेलीब्रेशन धडाक्यात होतं. मैदानात आम्ही पुरुष संघासह जल्लोष केला होता. ती गर्वाची बाब होती. त्या वेळी ऐकलेले राष्ट्रगीत कधीच विसरता येणार नाही. तो क्षण आजही आठवतो. देशाबाहेर आपले राष्ट्रगीत सुरू असताना इतर देशांचे लोक आदराने उभे राहतात हे चित्रच वेगळे आहे. अभिमान आहे या क्षणाचा साक्षीदार असल्याचा.रिओमध्ये भारतीय महिलांची कामगिरी कशी होईल? - मुलींनी केवळ आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करावे. त्यांना जपान, आॅस्टे्रलिया व अमेरिकेविरुद्ध खेळल्याचा फायदा मिळेल. भारताच्या गटात नेदरलँड, अर्जेंटिनासारखे बलाढ्य संघ आहेत. मात्र उपांत्यपूर्व फेरीचा नवीन नियम आपल्यासाठी एक संधी आहे. त्याचा फायदा मुलींनी उचलावा. परंतु, त्यांच्यावर आत्ताच दबाव टाकू नये. संघात कोण महत्त्वाची खेळाडू आहे?- सध्या प्रत्येक खेळाडू महत्त्वपूर्ण आहे. त्याप्रमाणे प्रशिक्षकाने सर्वांना तयार केले आहे. त्यामुळे प्रत्येक जण महत्त्वाचे आहे. आधी आपण एकाच खेळाडूवर अवलंबून होतो. पूर्वी ३५ मिनिटांचे दोन सत्र होते. मात्र आता नियम बदलल्याने चार क्वार्टरच्या सामन्यात कोणीही केव्हाही सामना फिरवू शकतो. देशात महिला हॉकीच्या प्रसारासाठी काय गरजेचे आहे?- महिला हॉकीला अधिक प्रसिद्धी मिळावी. तसेच दीर्घ काळ उपाययोजनांची आवश्यकता आहे. शिवाय सातत्याने राष्ट्रीय स्पर्धा होणे जरुरी आहे. जर स्पर्धाच नसतील, तर हॉकीमध्ये प्रगती कशी होणार? शिवाय खेळाडूंना नोकरी मिळायला पाहिजे. आज केवळ रेल्वेमध्येच महिला खेळाडूंना संधी आहेत. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंसाठीही इतर कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.रिओमध्ये पुरुष संघाकडून कशी अपेक्षा आहे?- पुरुष संघाला यंदा पदक जिंकण्याची मोठी संधी आहे. ती त्यांनी साधावी; कारण सध्या संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विशेष म्हणजे, संघ म्हणून ते खूप चांगले खेळत आहेत. गेल्या काही स्पर्धांत त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असल्याने असेच खेळत राहिले तर पुरुष संघ नक्की पदक जिंकेल.राष्ट्रीय खेळ हॉकी असण्यावर काय मत आहे?- हॉकी नेहमीच राष्ट्रीय खेळ राहिला आहे. हॉकीने देशाला एकत्र आणले. पण केवळ राष्ट्रीय खेळ म्हणून घोषणा न करता या खेळासाठी काहीतरी करायला पाहिजे. गल्लोगल्ली हॉकी खेळली जाण्यासाठी सरकारने आणि संघटनेने उपाययोजना करायला पाहिजेत. रिओमध्ये पदक जिंकून खेळाडूंनी हे चित्र बदलण्यास मदत करावी. तसेच केवळ पदक जिंकून चालणार नाही, तर हॉकीची हवा कायम कशी राहील याकडेही लक्ष द्यावे लागेल.भारताच्या महिला संघाला काय संदेश द्याल?- मुलींनो, पदक मिळविण्यासाठी स्वत:ला झोकून द्या, जीव तोडून खेळा आणि पदक घेऊन परत या. तुम्ही स्वत:वर कोणताही दबाव घेऊ नका. खेळाचा पुरेपूर आनंद घ्या. प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यासाठी झुंजवा. प्रतिस्पर्धी कायम तुम्हाला लक्षात ठेवतील असा खेळ करा. सहजासहजी हार पत्करू नका, अखेरपर्यंत लढा. -रोहित नाईक
मुलींनो, जीव तोडून खेळा!
By admin | Published: July 31, 2016 3:48 AM