नवी दिल्ली : भारतीय हॉकीचे महान सुपुत्र मेजर ध्यानचंद यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याचा आग्रह केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केला आहे. या महान खेळाडूला सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्याचे मंत्रालयाचे हे नवे प्रयत्न आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली. ते म्हणाले, ‘ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची विनंती आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे केली आहे. त्यांना मरणोपरांत हा सन्मान देणे हीच त्यांच्या कर्तत्वाला खरी श्रद्धांजली ठरेल.’ १९२८, १९३२ आणि १९३६ असे ओळीने आॅलिम्पिक हॉकी सुवर्ण मिळवून देणाऱ्या ध्यानचंद यांना हा सन्मान देण्याची क्रीडा मंत्रालयाद्वारे मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१३ मध्ये यूपीए सरकारने ध्यानचंद यांच्याऐवजी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने सन्मानित केले होते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच काही तासातच भारतरत्न मिळविणारा सचिन पहिला खेळाडू ठरणार असल्याची त्यावेळी घोषणा करण्यात आली होती.ध्यानचंद यांना तेंडुलकरपूर्वी हा सन्मान मिळायला हवा होता असे वाटत नाही काय, या प्रश्नाच्या उत्तरात गोयल म्हणाले, ‘मी या वादात पडू इच्छित नाही. महान खेळाडूंबाबत वक्तव्य करणे योग्य नाही. कुठल्याही पुरस्कारापेक्षा ध्यानचंद मोठे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची तुलना पुरस्कारांशी होऊ शकणार नाही.’ मी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आहे. अंतिम निर्णय मोदी घेतील. भारत क्रीडा क्षेत्रात नवी ताकद म्हणून पुढे यावा, अशी इच्छा असल्याने विविध खेळांच्या विकासावर सरकार भर देत आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयाला विनंतीपत्र लिहिण्याचा निर्णय झाला, असे गोयल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार आणि अन्य माजी खेळाडूंनी सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. माजी कर्णधार राहिलेले अशोक कुमार, अजितपालसिंग, जफर इक्बाल, दिलीप तिर्की यांच्यासह शंभर खेळाडूंनी ध्यानचंद यांच्याकडे डोळेझाक केल्याबद्दल उपोषणदेखील केले होते.याआधी २०११ मध्ये ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची लेखी मागणी ८२ खासदारांनी सरकारकडे केली, पण ती फेटाळण्यात आली होती.
ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्या
By admin | Published: June 08, 2017 4:16 AM