मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई क्रिकेट संघटनेने बोर्डाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत जस्टिस आर. एम. लोढा (निवृत्त) समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. एमसीएच्या कार्यकारी समितीने बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, ‘लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. सदस्यांनी सर्वसम्मतीने संयुक्त सचिवांसह उपाध्यक्ष आशिष शेलार यांची कायदेशिर सल्ला घेत न्यायालयात याचिक दाखल करण्यासाठी नियुक्ती केली.’लोढा समितीच्या एक राज्य एक संघटना (मत) शिफारसीचा थेट प्रभाव एमसीएवर पडणार आहे. कारण महाराष्ट्रात बीसीसीआयसोबत संलग्न असलेल्या चार संघटना आहेत. त्यात मुंबईतील एमसीए, पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, नागपूर येथील विदर्भ क्रिकेट संघटना आणि मुंबई येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया या संघटनांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त लोढा समितीने ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला बीसीसीआयच्या कार्यकारिणीत स्थान न देण्याचा सल्ला दिला आहे.
एमसीए ‘सुप्रीम’मध्ये जाणार
By admin | Published: February 23, 2016 3:14 AM