कॅनबरा : सलग तीन पराभवांमुळे मालिका गमाविणारा भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज, बुधवारी खेळल्या जाणाऱ्या चौथ्या वन-डे लढतीत यजमान संघाचा विजयरथ रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघाला गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांच्या निमित्ताने भारतापुढे केवळ प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. या निराशाजनक मालिकेत पहिला विजय मिळवण्यासाठी भारताला गोलंदाजांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला आहे, पण गोलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली आहे. पहिल्या तीन सामन्यांत मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मानुका ओव्हलवर भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच खेळणार आहे. भारताने येथे एकमेव सामना २००७-०८ च्या सीबी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्या लढतीत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश होता. सध्याच्या संघातील केवळ धोनी, रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा या मैदानावर खेळलेले आहेत. २००७-०८ च्या दौऱ्यात रोहित व ईशांत प्रथमच आॅस्ट्रेलियात खेळले होते. आठ वर्षांनंतर संघासाठी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे, तर युवा मनीष पांडे, गुरकिरत मान आणि ऋषी धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
प्रतिस्पर्धी संघ : भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकिरत मान, ऋषी धवन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर सरण. आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वार्नर, आरोन फिंच, जॉर्ज बेली, जॉन हेस्टिंग्स, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर, मॅथ्यू वॅड, मिशेल मार्श, नॅथन लियोन, स्कॉट बोलँड, शॉन मार्श, केन रिचर्डसन.