दुबई : गतविजेत्या भारतीय संघाला जेतेपदाचा बचाव करता यावा, यासाठी इंग्लंडमध्ये १ ते १८ जून या कालावधीत आयोजिण्यात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रत्येक विजयात योगदान देण्याचे अनुभवी फलंदाज युवराजसिंगने लक्ष्य आखले आहे. युवराज म्हणाला, ‘‘५० षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाल्याबद्दल मी आनंदी आहे. जेतेपदाचा बचाव करता यावा, यासाठी संघाच्या विजयात योगदान देण्याची आपली तयारी असेल. अन्य कुठल्याही आयसीसी स्पर्धेसारखीच हीदेखील आव्हानात्मक स्पर्धा आहे. ओव्हलवर १८ जून रोजी अंतिम सामना खेळण्याच्या इराद्यानेच प्रत्येक संघ उतरणार, यात शंका नाही. मी ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार असल्याने योगदान देणे किती कठीण असते याची जाणीव आहे.’’केनियात २००२ मध्ये झालेल्या स्पर्धेद्वारे पदार्पण करणाऱ्या युवीने २००६ पर्यंतच्या सर्वच स्पर्धेत भाग घेतला. तो २००९ आणि २०१३ च्या स्पर्धेत मात्र खेळला नव्हता. भारताला गटात पाकिस्तान, द. आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत स्थान मिळाले आहे. भारताने २०१३ च्या विजेत्या संघातील आठ खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यात विराट कोहलीसह रविचंद्रन आश्विन, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. कोहली आयसीसीच्या कुठल्याही मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा भारताचे नेतृत्व करेल. (वृत्तसंस्था)आम्ही बलाढ्य गटात असलो, तरी स्थानिक सत्रात यशस्वी कामगिरीनंतर खेळणार असल्याचा लाभ होईल. आॅस्ट्रेलियानंतर सलग दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळविण्याच्या इराद्यासह भारतीय संघ खेळेल. ब्रिटनमध्ये अनिवासी भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने आम्हाला येथे खेळताना घरच्यासारखेच वाटते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनास ब्रिटन हे सुंदर स्थळ आहे.- युवराज सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी योगदान देण्याचे लक्ष्य : युवराज
By admin | Published: May 11, 2017 12:43 AM