हरारे : सलामी लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघातील युवा खेळाडूंना झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी सोमवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.भारतीय संघाला या दौऱ्यात प्रथमच आव्हानाला सामोरे जावे लागले आणि मोक्याच्या क्षणी खेळाडूंची कामगिरी ढेपाळली. त्यामुळे भारताला शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून देता आला नाही; पण त्याचसोबत पराभवासाठी अन्य फलंदाजांची कामगिरीही कारणीभूत ठरली. चांगल्या सुरुवातीनंतर मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद झाले. मनीष पांडेने आक्रमक ४८ धावांची खेळी केली. मनदीप सिंगला पदार्पणाच्या लढतीत संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. धोनी दुसऱ्या टोकावर असताना भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. अक्षर पटेल आत्मघाती फटका मारून बाद झाल्यामुळे पाहुणा संघ अडचणीत आला. बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर दुय्यम दर्जाचा संघ पाठविण्यात आला. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत शानदार विजय नोंदवणाऱ्या युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाला कामगिरीची छाप सोडण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे, पण मालिकेत प्रथमच आव्हान मिळाल्यानंतर संघ दडपणाखाली आल्याचे दिसले. फलंदाजांना संयम दाखविता आला नाही आणि मालिकेत प्रथमच संधी मिळालेल्या गोलंदाजांची कामगिरीही निराशाजनक ठरली. वन-डे मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या यजमान झिम्बाब्वे संघाने शानदार पुनरागमन केले, हे कौतुकास्पद आहे; पण भारतीय गोलंदाजांनी चुका केल्यामुळे यजमान संघाला १७० धावांची मजल मारता आली. अष्टपैलू ऋषी धवन आॅस्ट्रेलिया दौऱ्यानंतर प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याने टी-२० मध्ये पदार्पणाची लढत खेळताना ४ षटकांत ४२ धावा बहाल केल्या. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट दडपणाखाली असल्याचे दिसून आहे. त्याने ४३ धावा बहाल केल्या आणि बळीच्या बाबतीत त्याची पाटी कोरीच होती. त्यामुळे यांच्या स्थानी सोमवारच्या लढतीत बरिंदर सरन व धवल कुलकर्णी यांना संधी मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहलने वन-डेमध्ये छाप सोडली होती, पण शनिवारच्या लढतीत त्याचीही कामगिरी साधारण ठरली. कर्णधार धोनीने खेळाडूंना चुका टाळण्याचा सल्ला दिला आहे. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत : - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के. एल. राहुल, फैज फजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि युजवेंद्र चहल.झिम्बाब्वे : -ग्रीम क्रॅमर (कर्णधार), वी सिबांडा, सिकंदर रजा, एल्टन चिगुम्बुरा, हॅमिल्टन मासकाद्जा, वेलिंग्टन मास्काद्जा, टेंडाई चतारा, चामू चिभाभा, डोनल्ड तिरिपानो, मॅल्कम वॉलर, पीटर मूर, तापिवा मुफुद्जा, टिनोटेंडा मुतोम्बोदजी, रिचमंड मुतुम्बामी, तौराई मुजारबानी, ब्रायन चारी, नेविल मादजिवा, तिमीसेन मारुमा.
भारताचे बरोबरी साधण्याचे लक्ष्य
By admin | Published: June 20, 2016 3:21 AM