लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खडतर परिस्थितीवर मात करण्याचे बाळकडू पाळण्यातच मिळाले, तर परिस्थितीचे आव्हान वाटत नाही. भारताची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम हिच्या देहबोलीवरून हेच स्पष्ट होत होते. परिस्थिती खडतर असली, तरी इंग्लंडमध्ये आयोजित महिला विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असल्याचा निर्धार मोनाने व्यक्त केला. एसजेएएनतर्फे आयोजित सत्कार समारंभानंतर मोनाने वार्तालाप कार्यक्रमात आगामी विश्वकप स्पर्धा व कारकिर्दीबाबत दिलखुलास बातचीत केली. विदर्भाची पहिली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असलेल्या मोनाचा गुरुवारी स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) सत्कार करण्यात आला. महापौर नंदा जिचकार व मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते मोनाला स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफल तसेच भेटवस्तू प्रदान करण्यात आली. मोनाच्या घरी आई ‘टिफीन’चे काम करीत होती. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बालपण खडतर गेले. घरात व्हॉलिबॉलची आवड असल्यामुळे आपसुकच मोनाचे पायही व्हॉलिबॉल मैदानाकडे वळले. व्हॉलिबॉलमध्ये राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करणाऱ्या मोनाला क्रिकेटचीही सुरुवातीपासून आवड होती. सुरुवातीला गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या मोनाने या खेळात कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. विचारांना योग्य दिशा व इच्छेला कुटुंबीयांचा सामूहिक प्रतिसाद मिळाला आणि त्यातच क्रिकेटपटू म्हणून मोनाचा उदय झाला. मोनाने श्रीलंकेत आयोजित विश्वकप पात्रता स्पर्धा व दक्षिण आफ्रिकेतील चार देशांच्या क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून लक्ष वेधले आहे.२०११मध्ये बीसीसीआयतर्फे ‘उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू’ पुरस्काराची मानकरी ठरलेल्या मोनाने आतापर्यंत १८ वन-डे व ८ टी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयसीसीनेही मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासह मोनाचा समावेश असल्यामुळे भारतीय संघ मजबूत असल्याचे म्हटले आहे.
आयसीसी विश्वविजेतेपदाचे लक्ष्य
By admin | Published: May 26, 2017 3:26 AM