पणजी : विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत गोव्याच्या समिरा अब्राहम हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंदांची वेळ देत गोव्याला सुवर्ण मिळवून दिले.
राष्ट्रीय स्तरावर ट्रायथलॉन या खेळात सुवर्णपदक मिळवणारी समिरा हा पहिली गोमंतकीय खेळाडू ठरली आहे. १.५ किमी पोहण्याची शर्यत तिने २७.४५ मिनिटांत पूर्ण केली. त्यानंतर ४० किमी अंतराच्या सायकलिंगसाठी १ तास १० मिनिटे आणि १६ सेकंद अशी वेळ दिली. त्यानंतर ५१.०५ मिनिटांचा वेळ तिने १० किमी धावण्याच्या शर्यतीसाठी दिला. ट्रायथलॉन हे अंत्यत आव्हानात्मक आहे. त्यात शारीरिक क्षमतेचा मोठा कस लागतो.
पुरुष गटात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कन्ट्रोल बोर्डच्या बिश्वजित सिंग याने सुवर्ण पटकाविले. त्याने २ तास ९ मिनिटे आणि ४६ सेकंदात पोहणे, सायकलिंग आणि धावण्याची शर्यत पूर्ण केली. बिश्वजित याने २०१५ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले होते. ही स्पर्धा तिरुअनंतपुरम (केरळ) येथे झाली होती. त्यात त्याने रौप्यपदक पटकाविले होते. महिला गटात गुजरातच्या प्रगना मोहन (२:३२:१२) हिने रौप्य तर गुजरातच्याच मोनिका नागपुरे हिने (२:३७:३५) कांस्यपदक पटकाविले. पुरुष गटात, सर्व्हिसेसच्या केएसएच मीनचंद्रा (२:११:१२) याने रौप्य तर मणिपूरच्या महेश (२:१५:३०) याने कांस्यपदक पटकाविले. गोव्याच्या संघात आदित्य कौल आणि सुधीर खुडे यांचा समावेश होता. आदित्य हा ८ व्या स्थानी राहिला. त्याने २:२५:४६ अशी वेळ दिली. सुधीरला (३:३३:५९) ३७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, गोवा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष अनिल मडगावकर यांनी गोव्याच्या संघाचे अभिनंदन केले. खास समिरा हिचे त्यांनी कौतुक केले.
पहिली गोल्डन गर्लट्रायथलॉन या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी समिरा ही पहिली गोमंतकीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये गोवा ट्रायथलॉन स्पर्धेत तिला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पुरुष गटात आदित्यने १८ वे स्थान मिळवले होते. या वेळी दोघांनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली. समिरा ही मेहनती खेळाडू आहे. तिने सुवर्णपदक मिळवून ट्रायथलॉनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.