इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याने अजूनही तो टीम इंडियात कमबॅक करू शकतो, हे कामगिरीतून दाखवून दिले आहे. दिनेशने मॅच विनिंग खेळी करताना RCBला दोन सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलच्या मैदानावर दिनेश कार्तिक दंगा घालत असताना त्याच्या पत्नीने दीपिका पल्लीकलने ( Dipika Pallikal ) भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. दोन मुलांच्या जन्मानंतर पुन्हा स्क्वॉश कोर्टवर परतलेल्या दीपिकाने सुवर्णपदक जिंकले.
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या भारतीय जोडीने WSF World Doubles Championships स्पर्धेतील मिश्र गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या एड्रीयन वॉलर व एलिसन वॉटर्सवर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. दीपिका व सौरव या जोडीने ११-६ व ११-८ अशा फरकाने चौथ्या मानांकित इंग्लंडच्या जोडीचा फडशा पाडला.
दीपिका आणखी एक फायनल खेळणार आहे. जोश्ना चिनप्पासह ती महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात उतरणार आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या जोएल किंग व अमांडा लँडर्स मर्फी यांनी माघार घेतली होती. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडच्या साराह-जेन पेरी व एलिसन वॉटर्सचे आव्हान आहे. दीपिका पल्लीकल ही दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे. कार्तिकने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 2015मध्ये स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लिकलसोबत लग्न केले होते.