जाकार्ता : भारताचा सलमान शेख, मनीष कौशिक, के. श्याम कुमार, आशिष यांनी पुरुषांच्या तर पवित्राने महिलांच्या गटात आशियाई निवड चाचणी मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीयांनी स्पर्धेत एकूण ५ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्य पदके जिंकली.पुरुषांच्या गटात इंडिया ओपन स्पर्धेतील विजेता मनीष कौशिकने ६० किलोगटात सलग दुसºयांदा सुवर्ण आपल्या नावावर केले. महिलांच्या ६० किलो गटात पवित्रा सुवर्णपदक जिंकणारी एकमेव भारतीय ठरली. तिने थायलंडच्या निलावन तेचास्यूपचा ५-० गुणांनी पराभव केला. तीन वेळचा किंग्ज चषक स्पर्धेतील विजेता के. श्याम कुमारने ४९ किलोगटात मारियो ब्लासियूस कालीला ४-१ गुणांनी नमवून सुवर्णपदक संपादन केले. या लढतीत श्यामला पंचांनी नियमबाह्य खेळ केल्याबद्दल ताकीद दिली. पुण्याचा असलेला सलमान शेख याने ५२ किलोगटात सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून फिलिपीन्सच्या रोजेन लाडोनला ५-० गुणांनी पराभूत करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. आशिषने ६४ किलोगटात जाकार्ताचा प्रबळ दावेदार सुगर रे ओकानाचा डाव्या, उजव्या हातांच्या ठोशांनी समाचार घेत त्याला कोणतीही संधी त देता पराभू करून विजेतेपद जिंकले.शशी चोपडाला ५७ किलोगटात मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
भारतीय मुष्टीयोद्धांनी नोंदवला सुवर्ण ‘पंच’; सलमान, श्याम, मनीष, आशिष, पवित्रा यांचे सुवर्ण यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:08 AM