- अमोल मचाले पुणे : पुण्याच्या 15 वर्षीय अवंतिका नरळेने हॉंगकॉंग येथे सुरू असलेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला. तिनं ११.९७ सेकंदच्या वेळेसह १०० मीटर शर्यतीत बाजी मारली आणि युवा गटात आशियातील सर्वात जलद धावपटू होण्याचा मान पटकावला. अवंतिकाच्या या यशामागे तिचे वडील संतोष यांच्या मेहनतीचा फार महत्त्वाचा वाटा आहे.
मुलीकडून काय अपेक्षा आहे या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘वडील म्हणून मी मुलीकडून काय अपेक्षा ठेवणार? तिने यात करिअर करायचे ठरवले म्हटल्यावर आम्ही तिला पूर्णपणे पाठिंबा दिला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती मेहनत घेत आहे. तिने सर्वस्व पणाला लावून धावावे आणि कोणतेही दडपण न घेता खेळाचा आनंद लुटावा, हीच माझी इच्छा आहे. माझ्या लेखी हेच यश आहे.’’
यासंदर्भात वडील म्हणाले, ‘‘मुलीचे पेपर हुकल्याची खंत अजिबातही नाही. पुरवणी परिक्षेत ते देता येईल. अवंतिकासाठी खेळ महत्वाचा आहे अन् माझ्यासाठी मुलीची आवड. परिक्षेच्या काळातही मुलीने सरावात अजिबातही खंड पडू न देता इतक्या मोठ्या स्पर्धेत यश मिळविले, याचा आम्हा आई-वडिलांना अभिमान आहे.’’
अवंतिकात ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची क्षमताप्रशिक्षक संजय पाटणकर यांनी सांगितले की,'' मैदानावर उतरल्यानंतर खेळाशिवाय इतर कशाचाही विचार न करणाऱ्या अवंतिकाच्या या यशाचा प्रशिक्षक म्हणून अर्थातच अभिमान वाटतो. तिच्यात ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची क्षमता नक्कीच आहे. ही मजल तिने मारावी, यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.अवंतिकाने शर्यतीच्या मधल्या टप्प्यात वेग वाढवायला हवा. असे केल्यास तिच्या वेळेत आणखी सुधारणा होईल. अलीकडील काळात ती सातत्याने धावत आहे. आता ८ महिने तिला आम्ही पूर्णपणे विश्रांती देणार आहोत. त्यानंतर पुढील स्पर्धांबाबत नियोजन करू.''
शिस्तबद्ध खेळाडू''अवंतिकाच्या यशात मेहनतीसोबतच शिस्तीचे योगदान महत्वाचे आहे. ती नियमितपणे सराव करते. यादरम्यान ती कटाक्षाने शिस्त पाळते. उत्तम आकलनक्षमता ही अवंतिकाची खासियत आहे. प्रशिक्षकाला काय सांगायचे आहे, हे तिला लगेच कळते. त्यानुसार ती कृती करते. भविष्यात तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत,'' असे प्रशिक्षक सुधाकर मेमाणे यांनी सांगितले.
ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे!दहावीच्या परिक्षेपेक्षा या स्पर्धेसाठी सरावावर मी जास्त लक्ष केंद्रित केले होते. इतक्या मोठ्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. प्रशिक्षक आणि आई-वडिलांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे ध्येय आहे.- अवंतिका नराळे