नवी दिल्ली : आशियाई चॅम्पियन धावपटू पीयू चित्राने या मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करीत स्वीडनमधील फोल्कसॅम ग्रँडप्रिक्सच्या १५०० मीटर शर्यतीचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी, जिन्सन जॉन्सनने रौप्य पटकावले.एप्रिल महिन्यात दोहा येथे आशियाई चॅम्पियनशिपचे सुवर्ण जिंकणाऱ्या चित्राने मंगळवारी केनियाची मर्सी शेरोनो हिला मागे टाकून ४ मिनिटे १२.६५ सेकंद वेळेसह सुवर्णावर नाव कोरले. मर्सीने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकले होते.दुसरीकडे, आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात रौप्य विजेता जिनसन जॉन्सन याने १५०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ३९. ६९ सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले. लांब उडीतील खेळाडू राष्टÑीय विक्रमाचा मानकरी मुरली श्रीशंकर यानेही अन्य एका स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. मुरलीने कोपनहेगन अॅथ्लेटिक्स स्पर्धेत ७.९३ मीटर उडी घेत अव्वल स्थान पटकविले. तिन्ही प्रयत्नांत त्याने ७.८९, ७.८८ आणि ७.६१ मीटर अशी नोंद केली.
धावपटू पीयू चित्राने जिंकले सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:55 AM