फेडरेशन करंडक अॅथलेटिक्स :सुधा आॅलिम्पिकसाठी पात्र नवी दिल्ली : लोकमत मिडिया लिमिटेडच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्रीय आॅफ दि इयर यावर्षीच्या पुरस्काराची मानकरी ललिता बाबरने फेडरेशन करंडक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्तापित करुन सुवर्णपदक जिंकून आपली मक्तेदारी कायम राखली. पंडित जवाहरलाल स्टेडियमच्या ट्रॅकवर सुरु असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या ललिता बाबरने शर्यतीच्या सुरुवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखत ९ मिनिट २७.०९ सेकंदात शर्यत पूर्ण करून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. उत्तर प्रदेशच्या सुधा सिंगने (९मि. ३१.८६से) रौप्य जिंकून रियो आॅलिम्पिकसाठीचे आपले तिकिट निश्चित केले तर पारूल चौधरीने (१०मि. ४७.४९सें.) कास्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या शितल भगत व एश्वर्या कल्याणकरला अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत केरळच्या अनिल्दा थॉमसने ५२.४० सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या थाळी फेक प्रकारात कृष्णा पुनियाने ५५.०९ मीटर थाळी भिरकावून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. पुनियाने दुखापतीमुळे खूप दिवस विश्रांती घेतली होती. सुधा सिंगने रियोची पात्रत्रा पूर्ण केल्यानंतर महासंघाचे सचिव सीके वॉलसन यांनी प्रतिष्ठीत शांघाई डायमंड लीगमध्ये सुधा प्रवेश द्यावा अशी विनंती केली आहे. पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात महाराष्ट्राच्या सचिन पाटीलला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. सचिनने ९ मिनिट १२.९९ सेकंदाची वेळ नोंदविली. हरियाणाच्या नवीन कुमारने (८ मि. ५५.०४से.) सुवर्ण तर मणीपूरच्या दुर्गा बुधाने (९ मि.०१.९१ से.) रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)
ललिताचा राष्ट्रीय विक्रमासह गोल्डन धमाका
By admin | Published: April 29, 2016 10:16 PM