नवी दिल्ली : भारताच्या टेनिस इतिहासात २०१५ या वर्षात सानिया मिर्झाचे नाव सुवर्णाक्षरांमध्ये लिहिले जाईल. टेनिस स्टार सानियाने यंदा डोळे दीपवणारी कामगिरी केली. सानियाने २०१५ मध्ये दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदासह एकूण दहा स्पर्धांमध्ये जेतेपदाला गवसणी घातली. आतापर्यंत अशी कामगिरी एकाही भारतीयाला करता आलेली नाही. सानियासह ४२ वर्षीय लिएंडर पेसनेही यंदाचे वर्ष संस्मरणीय ठरवले. त्याने मिश्र दुहेरीमध्ये तीन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावले. एकेरीमध्ये युकी भांबरीने वर्ष मावळतीला जात असताना जागतिक क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानियासाठी २९ आॅगस्टचा दिवस संस्मरणीय ठरला. सानियाला त्या दिवशी देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ने गौरविण्यात आले. क्रीडा मंत्रालयाने सानियाची या पुरस्कारासाठी निवड केल्यानंतर टीका झाली. त्यामुळे सानियाचा पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचे चित्र निर्माण झाले होते. २८ आॅगस्टपर्यंत सानियाला हा पुरस्कार मिळणार किंवा नाही, याबाबत साशंकता होती. सानियाने याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तर देण्याचे टाळले होते. पॅरालिम्पियन गिरीशाने न्यायालयात धाव घेताना सानियाला खेलरत्न प्रदान करण्यापासून रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. गिरीशाच्या मते, लंडन पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावण्याची कामगिरी मोठी आहे. त्यामुळे ‘खेलरत्न’ पुरस्कार मला मिळायला पाहिजे, असे गिरीशने याचिकेत म्हटले होते. केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सानियाच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. (वृत्तसंस्था)
‘गोल्डन गर्ल’ सानियाची चमक
By admin | Published: December 16, 2015 3:39 AM