हॅनोवर : भारतीय नेमबाज हीना सिद्धूने म्युनिचमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेपूर्वी हॅनोवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले तर पी. हरी निवेताने कांस्यपदकाची कमाई केली. हिनाने अंतिम फेरीत शानदार कामगिरी केली. ती शेवटी फ्रान्सच्या मॅथिल्डे लामोलेसह २३९.८ गुणांनी बरोबरीत होती. त्यानंतर तिने मॅथिल्डेविरुद्ध टायब्रेकमध्ये सरशी साधत सुवर्णपदक पटकावले. निवेता २१९.२ गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. हीना म्हणाली, ‘मी माझ्या सरावावर समाधानी आहे. ही सर्वोत्तम कामगिरी नसली तरी वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.’ या कामगिरीसह हीनाने पुढीलआठवड्यात होणाºया आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेसाठी चांगली तयारी झाली असल्याची प्रचिती दिली. हिनाने पात्रता फेरीत ५७२ गुणांसह चौथ्या स्थानी राहत अंतिम फेरीत स्थान मिळवले तर निवेताने ५८२ गुणांसह अव्वल स्थान पटकावित पात्रता मिळवली.म्युनिच आयएसएसएफ विश्वकप २२ ते २९ मे या कालावधीत होणार आहे. हीनाने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये सुवर्ण आणि १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
हीनाचा सुवर्णवेध, पी. हरी निवेताला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 4:48 AM