मुंबई : महाराष्ट्राच्या सागर कातुर्डे याने दक्षिण कोरियामध्ये अभिमानाने भारताचा तिरंगा फडकाविताना मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी भारतीय खेळाडूंनी दहापैकी सात वजनी गटांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर्धेत भारताचाच दबदबा राहिला. याशिवाय ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ हा बहुमान मिळवत भारताच्याच चिथरेश नटेशनने ‘मिस्टर वर्ल्ड’चा किताब पटकावला.जेजू आयलंड येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत भारतीयांचाच बोलबाला राहिला. एकूण दहा वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत भारतीयांनी कमालीचे वर्चस्व राखले. याआधी भारत श्री स्पर्धेत सहावेळा सुवर्णपदक पटकावलेल्या सागरने ७५ किलो वजनी गटातून सहभाग घेताना आपल्या पीळदार शरीरयष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले. तसेच, जयप्रकाश वेंकटेशन आणि सतीशकुमार रामचंद्रन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावल्याने या गटात भारताचेच वर्चस्व राहिले.स्पर्धेत ५५ किलो, ६० किलो आणि ६५ किलो या पहिल्या तीन वजनी गटांत भारताला एकही सुवर्ण मिळाले नाही. मात्र यानंतरच्या सलग सात वजनी गटांत भारताने सुवर्ण यशाची मालिका गुंफताना स्पर्धा अक्षरश: गाजवली. राजेशेखर नायक (७० किलो), सागर (७५ किलो), ए. बॉबी सिंग (८० किलो), मोहन सुब्रमण्यम (८५ किलो), चिथरेश नतेशन (९० किलो), दयानंद सिंग (१०० किलो) आणि अनुजकुमार तलियन (१०० +किलो) यांनी आपापल्या गटात वर्चस्व राखले.
महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेचे सुवर्ण यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:15 AM