कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही हातभार लागत आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली. रोहित शर्मा, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, पी व्ही सिंधू, नीरज चोप्रा, मेरी कोम आणि अनेक क्रीडापटू पुढे येऊन आर्थिक मदत करत आहेत. पण, भारतातील अनेक खेळाडूंकडे दान करण्यासाठी तेवढा पैसा नाही, अशात कारकीर्दित जिंकलेली पदकं आणि चषक हीच त्यांची संपत्ती... भारताचा 15 वर्षीय गोल्फपटू अर्जून भाटी यानं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी त्यानं जिंकलेली 102 चषक विकली आणि उभी राहिलेली रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीत दान केली.
Corona Virus : 'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला मदतीचं आवाहन केलं होतं. कोणतीही मदत ही मोठी किंवा लहान नाही, असंही त्यांनी नमूद केले होते. 15 वर्षीय गोल्फपटूनं त्याची सर्व चषकं विकून 4.30 लाख रुपये जमा केले आणि ती रक्कम त्यानं पंतप्रधान सहाय्यता निधीत जमाही केली. त्याच्या या चषकांमध्ये तीन वर्ल्ड गोल्फ चॅम्पियन्सशीपची चषकं होती आणि अन्य राष्ट्रीय जेतेपदं होती.''आपला देश सध्या संकटाचा मुकाबला करत आहे. माझ्या देशाच्या मदतीसाठी मी पुढाकार घेतला आहे. माझ्यापरीनं मी मदत करत आहे,'' असे भाटीनं सांगितलं.
तो पुढे म्हणाला,''गेल्या 8 वर्षांत मी 102 चषकं जिकंली आहेत. ही सर्व चषकं विकून मी 4.30 लाखांचा निधी जमा केला आहे आणि तो मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे.''