Mirabai Chanu wins Gold Medal : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने शुक्रवारी ५५ किलो वजनी गटात सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनलमध्ये सुवर्णपदक जिंकलं. या सुवर्णभरारीमुळे तिने २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी (Commonwealth Games 2022) पात्रता मिळवली. ५५ किलो वजनी गटात प्रथमच सहभागी होताना चानूने १९१ किलो (८६ किलो + १०५ किलो) वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं.
रौप्यपदक विजेती लिफ्टर ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्टेन्को हिने सर्वोत्तम १६७ किलोची (७७ किलो + ९० किलो) उचल केली. पण तिच्यापेक्षा मीराबाईची उचल ही तब्बल २४ किलोंनी जास्त ठरली. मलेशियाच्या एली कॅसांड्रा एंगलबर्टने १६५ किलोची उचल (७५ किलो + ९० किलो) केली. तिला तिसऱ्या स्थानी कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
डिसेंबरमध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधून बाहेर पडल्यानंतर गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चानूने स्पर्धात्मक लढतींमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यावेळी तिने ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं रौप्यपदक मिळवून देण्याचा इतिहास रचला होता. २७ वर्षीय मीराबाई चानूने तिच्या राष्ट्रकुल क्रमवारीच्या आधारे ४९ किलो वजनी गटात कॉमनवेल्थ गेम्ससाठीदेखील पात्रता मिळवली आहे. मात्र आजच्या पराक्रमानंतर तिला ५५ किलो वजनी गटासाठीही पात्रता मिळाली आहे.