फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी लादली होती. त्यामुळे जोवर हा बॅन उठविला जात नाही, तोवर भारतीय फुटबॉल संघ कोणतेही सामने खेळू शकणार नव्हता. अखेर टीम इंडियावर घातलेली बंदी आज उठविण्यात आली आहे. फिफाच्या समितीमधील सदस्यांनी २५ ऑगस्टपासून ही बंदी उठवल्याचं जाहीर केलं. त्यामुळे, भारतीय चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून यंदाचा महिला अंडर १७ विश्वचषकही आता भारताच होणार आहे.
महिलांचा अंडर १७ वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होता. मात्र, बंदीमुळे तो देखील फिफाने हिसकावून घेतला होता. एकीकडे क्रिकेटद्वारे अवघ्या जगावर राज्य करत असलेल्या भारतासाठी फुटबॉलमध्ये तो काळा दिवस उजाडला होता. मात्र, आजचा सोनेरी दिवस उजाडला असून क्रीडाप्रेमींसाठी ही सोनेरी पहाट आहे.
तिसऱ्या पक्षाने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचे कारण देत फिफाने काही दिवसांपूर्वीच हा कठोर निर्णय घेतला होता. भारतीय महासंघावरील बॅन आता तात्काळ प्रभावाने लागू होत असल्याचे फिफाने म्हटले. त्याचप्रमाणे बंदी उठविण्याचा निर्णयही तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचंही फिफाने जाहीर केलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (CoA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.
प्रफुल्ल पटेल कारण?
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या साऱ्या वादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 2004 मध्ये यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांना 2009 मध्ये भारतीय फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष बनविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2022 मध्ये पदावरून काढून टाकेपर्यंत ते अध्यक्ष होते. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती ३ पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहू शकत नाही. प्रफुल्ल पटेल राज्य संघटनांच्या संगनमताने निवडणुका होऊ देत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर आहे.