ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 10 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रीका संघांत रविवारी ओव्हलच्या मैदानावर निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज आहे. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज आणि कर्णधार ए.बी. डिव्हिलिअर्स या सामन्यासाठी पूर्णपणे फिट नसल्याचं वृत्त आहे.
पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यामध्ये डिव्हिलिअर्स दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पायाचे स्नायू ताणले गेले होते, त्यानंतर थोड्यावेळासाठी त्याने मैदानही सोडलं होतं. रविवारच्या मॅचआधी म्हणजे आज डिव्हिलिअर्सची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे.क्रिकेट साउथ अफ्रीकेनेही डिव्हिलिअर्सची फिटनेस टेस्ट होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर तो भारताविरुद्ध खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.भारत आणि दक्षिण अफ्रीका संघांत रविवारी होणारा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा सामना जिंकणा-या संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की होणार आहे तर पराभूत संघ मालिकेतून बाहेर पडेल.
जर डिव्हिलिअर्स हा सामना खेळू शकला नाही तर त्याच्याजागी फॅफ डु प्लेसिस संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. याशिवाय फरहान बेहारदीन याची डिव्हिलिअर्सच्या जागी संघात वर्णी लागू शकते.
दक्षिण आफ्रिकेच्या सराव सत्रास पोहोचला ग्रॅमी स्मिथ-
भारताविरुद्ध सामन्याच्या उंबरठ्यावर आपल्या संघाला काही महत्त्वपूर्ण टीप्स देण्यासाठी माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या सराव सत्रात पोहोचला. श्रीलंका आणि भारताविरुद्ध सामन्याच्या आधी माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकारानेदेखील कुसाल मेंडीस आणि अन्य युवा खेळाडूंसोबत एक सत्र व्यतीत केले होते आणि ते श्रीलंकेसाठी लाभदायक ठरले. एवढेच नव्हे तर विद्यमान कर्णधार अॅन्जोलो मॅथ्यूजनेदेखील त्याच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आज स्मिथची वेळ होती. तो काळ्या सूटमध्ये लॉर्डस्च्या इनडोअर नेटस्वर पोहोचला. त्याने जवळपास ३५ मिनिटे सराव सत्र पाहिले आणि मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो आणि अन्य सहकारी स्टाफशी चर्चा केली.स्मिथने काही टीप्स दिल्या का, याविषयी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक नील मॅकेन्जी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘निश्चितच ग्रॅमीचे आपले विचार आहेत. तो दक्षिण आफ्रिकेचा महान कर्णधार राहिला आहे आणि भारताविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्याआधी त्याच्या टीप्स कामी येतील. ग्रॅमी संघाच्या जवळपास असण्याने फायदा मिळतो.’ स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी समालोचक म्हणून सध्या इंग्लंडमध्ये आहे.