मुंबई : सिध्दार्थ कौल आणि पंकज सिंग यांनी दिलेल्या धक्क्यामुळे रणजी चॅम्पियन गुजरातची इराणी चषक सामन्यात शेष भारत संघाविरुध्द कोंडी झाली. परंतु, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतक झळकावलेल्या चिराग गांधीने (नाबाद १३६) अडचणीत आलेल्या संघाला सावरले. गांधीच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर गुजरातने पहिल्या दिवसअखेर ८ बाद ३०० अशी मजल मारली.ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, कर्णधार पार्थिव पटेलसह त्यांनी ४ फलंदाज केवळ ८२ धावांत गमावले. रणजी अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात तडाखेबंद शतक झळकावून संघाला पहिले विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार पार्थिव पटेल केवळ ११ धावा काढून परतला. यानंतर मनप्रीत जुनेजा (४७) आणि चिराग गांधी यांनी १०९ धावांची भागीदारी करून गुजरातला सावरले.अनियमित गोलंदाज मुंबईकर अखिल हेरवाडकरने चहापानाआधी जुनेजाला कर्णधार चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. यानंतर, गांधीने एक बाजू लावून धरताना खालच्या क्रमांकावरील फलंदाजांना हाताशी धरत पहिले प्रथमश्रेणी क्रिकेट शतक झळकावले. (क्रीडा प्रतिनिधी)पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा गांधी १५९ चेंडूत १८ चौकार व एका षटकारासह १३६ धावांवर नाबाद होता. दुसरीकडे त्याला साथ देणारा हार्दिक पटेल १९ चेंडूत २ चौकारांसह ९ धावांवर नाबाद आहे. शेष भारताकडून कौलने ७३ धावांत ४ बळी, तर पंकज सिंगने ७७ धावांत ३ बळी देत गुजरातच्या फलंदाजीला हादरे दिले. अखिल हेरवाडकरनेही एक बळी मिळवला. >संक्षिप्त धावफलकगुजरात (पहिला डाव) : ८८ षटकात ८ बाद ३०० धावा (चिराग गांधी खेळत आहे १३६, मनप्रीत जुनेजा ४७; सिध्दार्थ कौल ४/७३, पंकज सिंग ३/७७)
चिरागच्या शतकाने गुजरात सुस्थितीत
By admin | Published: January 21, 2017 4:59 AM