बंगळुरु : दुखापतीमुळे बॅडमिंटनपासून दूर असलेला भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्या अकादमीला सोडचिठ्ठी देत भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे याआधी भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालनेही गोपीचंद यांची अकादमी सोडली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे, रिओ आॅलिम्पिक रौप्य विजेत्या पी. व्ही. सिंधूच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका गोपीचंद यांचीच मानली जात आहे.सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांच्याबाबत गोपीचंद अधिक व्यस्त असल्याच्या कारणावरुन कश्यपने अकादमी सोडली असल्याची चर्चा सुरु आहे. शिवाय गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आता कश्यप पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या इंडोनेशियन मास्टर्स ग्रां. प्री. स्पर्धेतून पुनरागमन करेल. त्यामुळे यावेळी त्याच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार कश्यपने सध्या नवे प्रशिक्षक टॉम जॉन यांच्या टॉम बॅडमिंटन अकादमीमध्ये सरावास सुरुवात केली असल्याने, त्याने गोपीचंद अकादमी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)रिओमध्ये न खेळू शकल्याने खूप निराश कश्यपने सांगितले की, ‘‘गोपीचंद यांना मी माझ्या निर्णयाची आधीच कल्पना दिली होती आणि त्यांनी या निर्णयाचा आदर केला आहे. शिवाय दुखापतीमुळे मी रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळू शकलो नाही यामुळे खूप निराश होतो.’’ आगामी इंडोनेशिया, जपान आणि कोरिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज होणाऱ्या कश्यपचा सध्या बंगळुरुमध्ये कसून सराव सुरु आहे. >आॅलिम्पिकपूर्वी मला गुडघ्याच्या दुखापतीला सामोरे जावे लागल्याने हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. रिओला जाऊ न शकल्याने खूप निराश होतो. त्यामुळेच योग्य स्थितीमध्ये येण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.>लंडनमध्ये उपांत्यपुर्व फेरी गाठलेल्या कश्यपने रिओचे तिकिट जवळजवळ मिळवलेच होते. मात्र, नेमकी जर्मन ओपन स्पर्धेच्यावेळी त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने कश्यपचे रिओ स्वप्न तुटले. यामुळे कश्यपला मलेशिया सुपर सिरिज प्रीमियम आणि सिंगापूर ओपन स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती.
कश्यपनेही सोडली गोपीचंद यांची अकादमी
By admin | Published: August 25, 2016 4:36 AM