नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी मौन सोडताना शनिवारी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी) आणि आशियाई आॅलिम्पिक परिषद (ओसीए) यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर आयओएच्या निलंबनाचा मुद्दा सरकार दरबारी मांडणार असल्याचे म्हटले आहे.वादग्रस्त अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांना आजीवन अध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय जोपर्यंत मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आयओएला निलंबित करण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. रामचंद्रन म्हणाले, ‘‘मी कुटुंबाविषयी निगडित बाबींमुळे न्यूझीलंडमध्ये आहे. सरकारने सुरेश कलमाडी व अभयसिंह चौटाला यांना आजीवन अध्यक्ष बनवल्यामुळे भारतीय आॅलिम्पिक महासंघाला निलंबित केल्याचे मला माहीत आहे. आयओए ही संघटना ओसीए आणि आयओसीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. देशात परतल्यानंतर जेव्हा ओसीए-आयओसीचे कार्यालय उघडेल तेव्हा मार्गदर्शनासाठी या मुद्यावर त्यांच्याशी मी चर्चा करीन. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी हा मुद्दा सरकार दरबारी मांडेन.’’ रामचंद्रन हे २0१४ मध्ये आयओएचे प्रमुख बनण्याआधी जागतिक स्क्वॉश महासंघाचे अध्यक्ष होते.
‘निलंबनाचा मुद्दा सरकार दरबारी नेऊ’
By admin | Published: January 01, 2017 1:08 AM