कोलंबो : झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रिमरने तीन बळी घेत श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी आपल्या संघाला वर्चस्वाची संधी निर्माण करून दिली. क्रीमरचा लेग स्पिन मारा व दोन फलंदाज धावबाद झाल्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची पहिल्या डावात ७ बाद २९३ अशी अवस्था झाली. आजचा खेळ थांबला त्यावेळी असेला गुणारत्ने (२४) व रंगना हेराथ (५) खेळपट्टीवर होते. श्रीलंकेला झिम्बाब्वेची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ६३ धावांची गरज असून त्यांच्या तीन विकेट शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणादरम्यान स्नायू ताणल्या गेल्यामुळे गुणारत्ने आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. श्रीलंकेच्या फलंदाजांना क्रीमरच्या फिरकी माऱ्याला सामोरे जाताना अडचण भासली. क्रीमरने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार दिनेश चांदीमलला तंबूचा मार्ग दाखविला. चांदीमलने ५५ धावांची खेळी केली. त्याने अँजेलो मॅथ्यूजसह (४१) चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. चहापानापूर्वी कुसाल मेंडिसला (११) माघारी परतवणाऱ्या क्रीमरने अखेरच्या सत्रात दोन बळी घेतले. दिलरुवान परेराने दोन षटकार व दोन चौकारांच्या मदतीने ३३ धावांची खेळी केली. तो धावबाद झाला. त्याआधी, श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन देणारा सलामीवीर उपुल थरंगाही धावबाद झाला. त्याने ७१ धावांची खेळी केली. वेगवान गोलंदाज डोनाल्ड तिरपानोने दिमुथ करुणारत्नेला (२५) उपाहारानंतर पहिल्याच षटकात बाद करीत झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून दिले. त्याने थरंगासोबत सलामीला ८४ धावांची भागीदारी केली. सकाळच्या सत्रात झिम्बाब्वे संघाला आज केवळ चार षटके खेळता आली. झिम्बाब्वेचा डाव ३५६ धावांत संपुष्टात आला. शुक्रवारी नाबाद असलेला फलंदाज क्रेग इर्विनने १६० धावा केल्या. डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने ११६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. त्याने ८१ कसोटी सामन्यांत ३० व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)
ग्रीम क्रीमरमुळे श्रीलंका अडचणीत
By admin | Published: July 16, 2017 2:03 AM