लंडन : भारताविरुद्ध सामन्याच्या उंबरठ्यावर आपल्या संघाला काही महत्त्वपूर्ण टीप्स देण्यासाठी माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या सराव सत्रात पोहोचला. श्रीलंका आणि भारताविरुद्ध सामन्याच्या आधी माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकारानेदेखील कुसाल मेंडीस आणि अन्य युवा खेळाडूंसोबत एक सत्र व्यतीत केले होते आणि ते श्रीलंकेसाठी लाभदायक ठरले. एवढेच नव्हे तर विद्यमान कर्णधार अॅन्जोलो मॅथ्यूजनेदेखील त्याच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आज स्मिथची वेळ होती. तो काळ्या सूटमध्ये लॉर्डस्च्या इनडोअर नेटस्वर पोहोचला. त्याने जवळपास ३५ मिनिटे सराव सत्र पाहिले आणि मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो आणि अन्य सहकारी स्टाफशी चर्चा केली.स्मिथने काही टीप्स दिल्या का, याविषयी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक नील मॅकेन्जी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘निश्चितच ग्रॅमीचे आपले विचार आहेत. तो दक्षिण आफ्रिकेचा महान कर्णधार राहिला आहे आणि भारताविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्याआधी त्याच्या टीप्स कामी येतील. ग्रॅमी संघाच्या जवळपास असण्याने फायदा मिळतो.’ स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी समालोचक म्हणून सध्या इंग्लंडमध्ये आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सराव सत्रास पोहोचला ग्रॅमी स्मिथ
By admin | Published: June 10, 2017 4:51 AM