मुंबई - भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर असलेल्या रेवथी वीरामणीने टोकियो ऑलिंपिक 2020 स्पर्धेसाठी टीम इंडियात स्थान निश्चित केलं आहे. आपल्या ध्येयपूर्तीसाठी रेवथीने घेतलेले कष्ट आणि परिस्थितीशी दोनहात करत केलेला संघर्ष देशातील कोट्यवधी तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. तमिळनाडूच्या मदुराईची कन्या असलेल्या रेवथीला 4x400 मिश्र रिले संघात स्थान मिळवले आहे.
भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने टोकियो ऑलिंपिक 2020 साठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये, मिश्र रिले 4x400 क्रीडा प्रकरात सार्थक भांबरी, एलेक्स एँटनी, रेवथी वीरामणी, सुभा व्यंकटेशन आणि धनलक्ष्मी सेकर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी रेवथी तमिळनाडूची असून सध्या रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहे. रेवथीच्या या यशाबद्दल रेल्वे विभागाकडूनही तिचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ग्रॅज्यूएट असेल्या 23 वर्षीय रेवथीच्या आई-वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते. त्यानंतर, आजीनेच काबाडकष्ट करत तिला लहानाचं मोठं केलं. रेवथीसह तिच्या लहान बहिणीचा सांभाळही आजीनेच केला. आता रेवथीने टोकियो ऑलिंपिंकचे तिकीट फिक्स केलं आहे. मिक्स रिले या क्रीडाप्रकारात रेवथी देशाचं प्रतिनिधित्व करत असून संपू्र्ण देशाच्या नजरा तिच्याकडे लागल्या आहेत.
मदुराई जिल्ह्यातील सक्कीमंगलम या लहानशा खेड्यात रोजंदारीवर काम करुन रेवथीच्या आजीने तिचा सांभाळ केला आहे. रेवथी 5 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर, तिच्या आईच्या आईने म्हणजेच आजीनेच दोन्ही लहान मुलांना सांभाळले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने बुट घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी, अनेकदा रेवथीने अनवाणी सराव केला. आजी आर्मलने रेवथीला घडविण्यात मोठं योगदान दिलं. तसेच, तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाचे प्रशिक्षक कन्नन यांनीही शाळेतच रेवथीमधील धावपटूचे गुण ओळखले. त्यानंतर त्यांनी तिच्या क्रीडा क्षेत्रातील भरारीसाठी मदत व मार्गदर्शन केलं.
रेवती शाळेत असताना तिच्यातील धावपटूचे गुण ओळखून तिच्या शिक्षकांनी रेवथीला प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यासाठी विचारले. त्यावेळी, सुरुवातीला आजीला नको वाटत होते. पण, शिक्षकांच्या आग्रहानंतर आजीने रेवथीला प्रशिक्षणसााठी पाठवले. आज रेवथीची टीम इंडियाकडून ऑलिंपिकसाठी निवड झाल्याचा अत्यानंद होत असल्याचे रेवथीची आजी आर्मलने म्हटलं आहे. तसेच, तिच्या प्रशिक्षकांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान, याच महिन्यात 23 जुलैपासून जपानच्या टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताकडून आत्तापर्यंत 115 खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली आहे.