मुंबई: महाराष्ट्राच्या मराठी मातीनं देशाला असे अनेक शिलेदार दिले, ज्यांनी जगभर भारतमातेची शान वाढवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन यशाचं शिखर गाठलं, मोठ्या व्यासपीठांवर तिरंगा फडकावला. असाच पराक्रम करण्यासाठी नाशिकचा विदीत गुजराथी सज्ज आहे. महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर विदीत बहुचर्चित अशा कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विदीत पाचवेळचा चीनचा चॅम्पियन खेळाडू डिंग लिरेनला आव्हान देईल. उल्लेखणीय बाब म्हणजे या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे.
आठ खेळाडूंमध्ये ही स्पर्धा पार पडेल, त्यातील तीन शिलेदार भारतीय आहेत. भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विदीत गुजराथी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानवीर निश्चित केलेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. त्याच्याशिवाय भारताचा अव्वल मानांकित डी. मुकेश, आर प्रज्ञानंद हे देखील पात्र ठरले आहेत. आठपैकी तीन बुद्धिबळपटू भारतीय असल्यानं विदीतनं आनंद व्यक्त केला पण जिंकण्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं नमूद केलं.
चीनला 'मराठी' आव्हान!मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विदीतनं त्याचा संघर्ष, इथपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील आव्हानांचा पाढा वाचला. तसेच महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असल्याची भावना त्यानं व्यक्त केली. जागतिक विजेता चीनच्या डिंग लिरेनचा आव्हानवीर ठरवण्यासाठी ही स्पर्धा २ ते १५ एप्रिल दरम्यान कॅनडातील टोरॅण्टो येथे खेळवली जाणार आहे. मूळचा नाशिकचा असलेला विदीत जागतिक क्रमवारीत १५व्या क्रमांकावर स्थित आहे. त्यानं आयल ऑफ मॅन येथे झालेल्या फिडे ग्रॅण्ड स्विस २०२३ स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर या स्पर्धेचे तिकिट मिळवलं.
भारताचे तीन खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत, मग आपल्या देशाला अधिक संधी आहे का? असं विचारलं असता विदीतनं म्हटलं, "नक्कीच आपल्या देशातील तीन खेळाडू आहेत याचा आनंद आहे. पण मी मला कसं जिंकता येईल याचा फक्त विचार करतो. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे." सुरूवातीच्या काळात तयारीसाठी सरकारकडून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत मिळाली असल्याचं 'लक्ष्य स्पोर्टस'च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण, आता मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी आर्थिक बाबींचा तुटवडा भासतो, यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार करून आर्थिक मदतीसाठी आणि स्पॉन्सरशिपसाठी विनंती केली असल्याचं त्यानं नमूद केलं.
विदीतला महाराष्ट्र सरकारचं हवंय पाठ'बळ' 'लक्ष्य स्पोर्टस'च्या माध्यमातून विदीत त्याच्या कारकिर्दीत पुढे जात आहे. लक्ष्य स्पोर्टस ही एक एनजीओ संस्था असून खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम करते. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी देखील विदीतला आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन पातळीवर चर्चा केली. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्य आणि विदीतचे स्पॉन्सर्स 'भारत फोर्ज' त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून बरोबर आहेत आणि असेच भविष्यातही उभे राहू याची आम्ही खात्री देतो.
प्रतिष्ठित आयल ऑफ मॅन येथील स्पर्धा जिंकणारा विदीत हा पहिला भारतीय खेळाडू आहे. याशिवाय आव्हानवीर स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो पहिला महाराष्ट्रातील बुद्धिबळपटू आहे. लहान वयापासूनच विदीतला बुद्धिबळाचे आकर्षण होते. सुरूवातीच्या काळात क्रिकेट आणि बॅडमिंटनमध्ये रस होता मात्र तिथे मी जास्त काळ रमलो नसल्याचं तो सांगतो. विदीत २०१४ पासून भारतीय बुद्धिबळ संघाचा अविभाज्य भाग आहे. २०१४ पासून आतापर्यंत त्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंग्याची शान वाढवण्याचं काम केलं. बुद्धिबळ विश्वचषक, बुद्धिबळ ऑलिम्पियाड, जागतिक सांघिक बुद्धिबळ आणि आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या यशात विदीतचा मोठा हात आहे.
आगामी स्पर्धेसाठी विदीतला कॅनडात एक महिन्याहून अधिक काळ राहावं लागणार आहे. त्याचे सहकारी देखील तिथे उपस्थित असतील. त्यामुळे आर्थिक मदतीची गरज असल्याचं त्यानं आवर्जुन सांगितलं. "माझं ध्येय साध्य करणयासाठी भारत आणि महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी तामिळनाडू सरकारनं मुकेश आणि प्रज्ञानंद यांना आवश्यक ती आर्थिक मदत केली. त्यामुळे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून मदतीची अपेक्षा करतो", अशा शब्दांत विदीतने महाराष्ट्र सरकारला मदतीसाठी आवाहन केलं.