विम्बल्डन : ‘माझ्याकडे अंतिम सामना जिंकण्याची संधी होती; पण मी काही चुका केल्या आणि ही संधी गमावली. याच गोष्टीची मला खंत आहे,’ असे सांगत सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने आपली निराशा व्यक्त केली. रविवारी रात्री विम्बल्डन अंतिम सामन्यात जोकोविचला स्पेनच्या कार्लोस अल्काराझविरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
पहिला सेट ६-१ अशा मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर दुसरा सेट टायब्रेकमध्ये जिंकण्यापासून जोकोविच केवळ एका गुणाने मागे होता. मात्र, ही संधी त्याने गमावली आणि अल्काराझने हा सेट जिंकत पुढे सामनाही जिंकला. यानंतर पाचव्या सेटमध्येही ब्रेक पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नात जोकोविचची वॉली चुकली आणि अल्काराझने मिळालेली संधी साधत बाजी मारली. म्हणूनच या पराभवानांतर, ‘नक्कीच खंत आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. जोकोविच म्हणाला की, ‘माझ्याकडे संधी होत्या. माझ्या मते दुसऱ्या सेटमधील टायब्रेकचा शेवट मी चांगल्याप्रकारे करू शकलो असतो. मात्र, जबरदस्त संघर्ष आणि शानदार बचावात्मक कौशल्य दाखवत अल्काराझने पुनरागमन केले. याचे श्रेय त्याला दिलेच गेले पाहिजे.’
४ तास ३० मिनिटे रंगली लढत२०१९ सालचा फेडरर आणि जोकोविच यांच्यातला विम्बल्डनचा अंतिम सामना तब्बल ४ तास ५७ मिनिटे चालला होता. विम्बल्डनच्या इतिहासात हा सर्वाधिक वेळ चाललेला सामना ठरला होता. रविवारी अल्काराझ-जोकोविच यांच्यातील लढत हा विक्रम मोडेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र असे होऊ शकले नाही. तरीसुद्धा तब्बल ४ तास ३० मिनिटे ही मॅरेथॉन लढत झाली.
मुलांकडे पाहून जोको रडला!पराभव झाल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात जोकोविच भावुक झाला. यावेळी स्टँडमध्ये उपस्थित त्याचा ८ वर्षीय मुलगा स्टीफन, मुलगी तारा आणि पत्नी येलेनाकडे पाहून जोकोविचला अश्रू अनावर झाले. जोकोविच म्हणाला की, ‘मुलं अजूनही येथे उपस्थित राहून स्मितहास्य करताना पाहून चांगले वाटले. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला पाठिंबा देण्यासाठी खूप धन्यवाद. मी तुम्हाला खूप प्रेमाने आलिंगन देईन.’