नागपूर : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा प्रियांक पांचाल आणि सर्वाधिक बळी घेणारा झारखंडचा शहबाज नदीम रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत आमने-सामने राहणार आहे. उभय खेळाडूंचा सध्याचा फॉर्म बघता लढत रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उभय संघांना प्रबळ दावेदार मानले जात नसले तरी यंदाच्या मोसमात तटस्थ स्थळावर खेळताना संघातील प्रतिभावान खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. गुजराततर्फे पांचालने ११०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या. सलामीवीर समित गोहेलने गेल्या लढतीत विश्वविक्रमी ३५९ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त यष्टिरक्षक कर्णधार पार्थिव पटेलच्या उपस्थितीमुळे गुजरात संघ बळकट झाला आहे. पार्थिवला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ४०० पेक्षा कमी धावांची गरज आहे. संघाला डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची उणीव भासणार आहे. बोटावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो या लढतीत खेळणार नाही. यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघासाठी प्रमुख अस्त्र ठरणार आहे. बुमराहला या लढतीच्या निमित्ताने इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे मालिकेसाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे. झारखंडची फलंदाजी बऱ्याच अंशी युवा ईशान किशनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने यंदाच्या मोसमात ७१९ धावा फटकावल्या आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध २७३ धावांची खेळी केली होती. त्याला सौरभ तिवारी व ईशांक जग्गी या अनुभवी खेळाडूंची चांगली साथ लाभली. युवा विराट सिंग गुजरातच्या गोलंदाजांपुढे अडचण निर्माण करू शकतो. झारखंडच्या यशामध्ये भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मेंटर म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली आहे. (वृत्तसंस्था)- झारखंडची आशा फिरकीपटू नदीमच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सिव्हिल लाईन्स स्टेडियमची खेळपट्टी अनुकूल ठरेल, अशी नदीमला आशा आहे. नदीमने आतापर्यंत ५० बळी घेतले आहे. त्याला राहुल शुक्लाची योग्य साथ लाभली आहे.
गुजरात-झारखंड उपांत्य लढत आजपासून
By admin | Published: January 01, 2017 1:10 AM