मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी आयपीएलचे आठवे पर्व निराशाजनक ठरले होते. त्यावेळी त्यांना अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, पण यावेळी मात्र किंग्स इलेव्हन संघ विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहे. किंग्स इलेव्हन संघाला सोमवारी सलामी लढतीत गुजरात लॉयन्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाने यंदाच्या मोसमात एकाही दिग्गज खेळाडूला करारबद्ध केलेले नाही. किंग्स इलेव्हन संघाचे नेतृत्व यावेळी जॉर्ज बेली ऐवजी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेव्हिड मिलरकडे सोपविण्यात आले आहे. वीरेंद्र सेहवाग आता तो मेंटरच्या भूमिकेत आहे. प्रीती झिंटाचा संघ संतुलित नसल्याचे भासत आहे. गेल्या मोसमात त्यांच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखत आले नाही. चांगली धावसंख्या उभारली तर गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. पदार्पणाची लढत खेळणारा गुजरात लॉयन्स संघ संतुलित भासत आहे. फलंदाजी व व गोलंदाजीमध्ये त्यांच्या संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. ब्रॅन्डन मॅक्युलमसारख्या आक्रमक फलंदाजाच्या समावेशामुळे गुजरात लॉयन्सला वर्चस्व गाजवण्याची संधी आहे. कर्णधार सुरेश रैना, अॅरोन फिंच यांच्या व्यतिरिक्त अव्वल अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा व जेम्स फॉकनर यांच्या समावेशामुळे गुजरात संघाचा समतोल साधल्या गेल्या आहे. टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंना फलंदाजी क्रमामध्ये कुठही खेळवण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे रैना व ब्राव्हो डाव सावरू शकतात आणि आक्रमक खेळीही करू शकतात. ब्राव्हो व फॉकनर यांच्यात अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करण्याची क्षमता आहे. गुजरात संघाची कमकुवत बाजू वेगवान गोलंदाजी आहे. कारण त्यांच्या संघात दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन वगळता स्थानिक व विदेशातील एकही स्टार गोलंदाज नाही. स्टेनचा फॉर्म बघता त्याला सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत संधी मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. किंग्स इलेव्हनची भिस्त मिलर, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मुरली विजय आणि मिशेल जॉन्सन यांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. मिलरला कर्णधारपदाचा विशेष अनुभव नाही. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये केवळ तीनदा संघाचे नेतृत्व केले आहे. त्याला मॅक्सवेलच्या साथीने फलंदाजीमध्येही मोठी भूमिका बजवावी लागणार आहे. गेल्या वर्षी फॉर्मात नसलेल्या मनन व्होराला विजयच्या साथीने डावाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. किंग्स इलेव्हनकडे शॉर्न मार्शचा पर्याय उपलब्ध आहे. फिरकीची बाजू सांभाळण्यासाठी अक्षर पटेल व मॅक्सवेल सक्षम आहेत. गुरकिरत सिंग, स्वप्नील सिंग व के.सी. करिअप्पा हे गोलंदाज त्यांची साथ देण्यासाठी सज्ज आहेत. जॉन्सन, संदीप शर्मा, मोहित शर्मा व केली एबोट संघाचे मुख्य गोलंदाज असतील, पण त्यांना आयपीएलमध्ये चांगली सुरुवात करावी लागेल. (वृत्तसंस्था)
गुजरात लॉयन्सचा पहिला पेपर
By admin | Published: April 11, 2016 2:14 AM