ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ : गुजरातने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा अवघ्या १ धावेने पराभव झाला. दिल्लीची सुरवात निराशाजनक झाल्यानंतर मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने केलेली तुफान फटकेबाजी या सामन्यातील आकर्षण ठरले. ख्रिस मॉरिसने आज अष्टपैलू कामगीरी करताना गोलंदाजीत २ फलंदाज बाद केले तर तुफानी फलंदाजी करताना २९ चेंडूत ७६ धावा करत संघाला अशक्यप्राय विजयाच्या जवळ खेचून आणले पण शेवटच्या षटकात ब्राव्होने टिचून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातकडून कुलकर्णी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने ४ षटकात १९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजाला बाद केले. मॉरिसने आज २९ चेंडूत तुफानी फटकेबाजी करतना ८ षटकार आणि ४ चौकार खेचत नाबाद ७६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून इतर फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. मॉरिस आणि डुमीनी (४८) वगळता एकाही फलंदाजाला फलंदाजाला मैदानावर टिचून फलंदाजी करता आली नाही. ३ विजयानंतर दिल्लीचा हा पराभव आहे. तर मागील पराभवची मालिका गुजरातने आज खंडित करत रोमांचक विजय मिळवला.
त्यापुर्वी, दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार झहीर खानने गुजरात लायन्स संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सुरवातीलाच गुजरातच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत दिल्लीचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. स्मिथ-मॅक्युलमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य आहे.
सलामीवीर स्मिथ-मॅक्युलमने पावरप्लेच्या ६ षटकात ७१ धावा चोपल्या. स्मिथ-मॅक्युलमने ताबडताफ फलंदाजी करताना ११२ धावांची सलामी दिली. स्मिथने ३० चेंडूत ५३ धावा केल्या त्याला इम्रान ताहिरने बाद केले. स्मिथ बाद झाल्यानंतर मॅक्युलमही लगेच माघारी परताला आणि गुजरातच्या धावसंखेली खीळ बसली. मॅक्युलमने ६० धावांचे योगदान दिले. कर्णधार रैना आज अपयशी ठरला त्याला २ धावावर मॉरिसने बाद केले. दिनेश कार्तिक(१८), जडेजा (४), इशान किशन (२) यांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्याने दिल्लीला थोडा आराम मिळाला. आणि गुजरातला मोठ्या धावसंख्या उभा करण्यापासून रोखले. ब्राव्हो (७) आणि फॉक्नरने (२२) धावांचे योगदान दिले.
दिल्लीकडून झहीर खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ४ षटकात ४८ धावांची लयलूट केली. इम्रान ताहिरने ३, मॉरिस २ आणि डुमनीने एका फलंदाजाला बाद केले.