पणजी : ब्युनोस आयर्स (अर्जेन्टिना) येथे ६ ते ८ आॅक्टोबर दरम्यान होणाºया युवा आॅलिम्पिक स्पर्धेच्या चेफ द मिशनपदी गोवा आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव गुरुदत्त भक्ता यांची निवड झाली आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी भक्ता यांना ईमेल द्वारे त्यांची निवडीची माहिती कळविली. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांची गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या महासचिवपदी फेर निवड झाली होती. युवा आॅलिम्पिकच्या प्रमुखाची जबाबदारी भक्ता यांना पहिल्यांदाच मिळाली आहे. त्यामुळे हा गोव्याचा मान समजला जात आहे. भक्ता यांनी आपल्या निवडीबद्दल भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे आभार व्यक्त केले आहेत.
अर्जेन्टिना येथे होणाºया या स्पर्धेत १३ विविध खेळांसाठी भारताचे ४६ खेळाडू, १४ प्रशिक्षक व ७० सदस्य असा ताफा असेल. १ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथून भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडून सर्वांना निरोप दिला जाईल. गुरुदत्त भक्ता यांच्या निवडीचे गोवा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक, खजिनदार परेश कामत व इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. भक्ता हे सध्या गोवा ज्युडो संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी १२ देशांच्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धेच्या समितीच्या उपाध्यक्षपदी काम केलेले आहे. गोव्यात २०१४ मध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली होती. त्यांनी आसाम, केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांतही उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. मकाऊ (चीन) येथे झालेल्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धेत त्यांनी गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व केले होते. भक्ता हे गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातील मानाचा दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत.
दरम्यान, भक्ता यांनी ही आपल्यासाठी एक मोठी संधी असून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खेळाडूंना येणाºया समस्या, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मनोबल उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याचेही ते म्हणाले.