ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - फलंदजांची कसोटी घेणाऱ्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाने अतिबचावात्मक पवित्रा घेतला आहे. चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 163 धावा झाल्या होत्या. अश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्माने टिच्चून मारा केल्याने आज सकाळपासूनच पाहुण्या फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडावे लागले. दरम्यान, अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची (33) दांडी गुल करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वॉर्नर बाद झाल्यावर मॅट रेनशॉ आणि स्टीव्हन स्मिथने सावध पवित्रा घेतला. त्यातच भारताकडूनही तिखट मारा झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या धावांचा ओघ आटला. रेनशॉ आणि स्मिथची जोडी भारताची डोकेदुखी वाढवणार असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने स्मिथची विकेट काढली. जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण वृद्धिमान साहाने स्मिथचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर रेनशॉ आणि शॉन मार्श यांनी उपाहारापर्यंत अधिक नुकसान होऊ न देता ऑस्ट्रेलियाला 2 बाद 87 धावांपर्यंत मजल मारून दिली.
उपाहारानंतर रेनशॉ आणि शॉन मार्शने पुन्हा भारताच्या गोलंदाजांना सतावले. दरम्यान रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो 60 धावा काढून जडेजाची शिकार झाला. त्यानंतर हँडस्काँबने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर अश्विनने एक अप्रतिम झेल टिपत हँडस्काँबला परतीची वाट दाखवली. त्यानंतर मिचेल मार्शही चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर इशांत शर्माची शिकार झाला. ऑस्ट्रेलियन संघ अद्याप 26 धावांनी पिछाडीवर आहे.