वायनाड : अक्षर पटेलच्या (नाबाद ६९) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या व अखेरच्या अनधिकृत कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४१७ धावांची मजल मारली. भारताकडे एकूण १५७ धावांची आघाडी आहे. पावसाने वर्चस्व गाजवलेल्या तिसऱ्या दिवशी केवळ २२ षटकांचा खेळ झाला. भारताने कालच्या धावसंख्येत ७५ धावांची भर घातली. पाच बळी घेणाऱ्या अक्षर पटेलने फलंदाजीमध्ये चमक दाखवताना ९३ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे पाचवे अर्धशतक आहे. त्याने नवव्या विकेटसाठी कर्ण शर्मासोबत (नाबाद १९) ६९ धावांची भागीदारी केली. भारताने सकाळच्या सत्रात दोन विकेट झटपट गमावल्या. यष्टिरक्षक फलंदाज अंकुश बैस (३५) कालच्या धावसंख्येत केवळ एका धावेची भर घालून माघारी परतला. हारदुस विलजोएनच्या चेंडूवर रिजा हेंड्रिक्सने स्लिपमध्ये बैसचा झेल टिपला. जयंत यादव खाते न उघडताच तंबूत परतला. भारताची ८ बाद ३४८ धावसंख्या असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर अक्षरने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.दीडशेपेक्षा अधिक धावांची आघाडी असलेला भारत ‘अ’ संघ गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाचा डाव गुंडाळण्याची संधी देण्यासाठी शुक्रवारी सकाळी डाव घोषित करण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
अक्षरचे अर्धशतक, भारताची दमदार मजल
By admin | Published: August 28, 2015 3:37 AM