साओ पावलो : बलाढ्य मर्सिडीजचा स्टार ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याने आपला धडाका कायम राखताना ब्राझिलीयन ग्रां. प्री. विजेतेपदावर कब्जा केला. त्याच वेळी एफ वन रेसमधील एकमेव भारतीय संघ असलेल्या ‘फोर्स वन’च्या रेसर सर्जियो परेरा (मॅक्सिको) आणि निको हल्केनबर्ग (जर्मनी) यांनी अनुक्रमे चौथे व सातवे स्थान मिळविले. विशेष म्हणजे, यंदाच्या मोसमात फोर्स इंडियाने शानदार कामगिरी करताना आपले चौथे स्थान जवळपास निश्चित केले आहे.तीन वेळचा विश्वविजेता ठरलेल्या हॅमिल्टनने यासह यंदाच्या मोसमातील अंतिम विजेता ठरण्यासाठी अखेरच्या शर्यतीपर्यंत उत्सुकता वाढवली आहे. सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आपला संघसहकारी निको रोसबर्गपेक्षा केवळ १२ गुणांनी हॅमिल्टन मागे आहे. या शर्यतीत रोसबर्गला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. यंदाच्या वर्षातील हॅमिल्टनने नववे जेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, पोल पोझिशनपासून सुरुवात करताना त्याने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. यासह त्याने रोसबर्गच्या ९ विजेतेपदांची बरोबरी केली आहे. दुसरीकडे, ब्राझिलीयन ग्रां. प्री. फोर्स इंडियासाठी शानदार ठरली. परेजने चौथे स्थान मिळवताना १२ गुणांची कमाई केली. तर, हल्केनबर्गला सातव्या स्थानासह ६ गुणांवर समाधान मानावे लागले. तसेच, यंदाच्या अव्वल ड्रायव्हर्सच्या चॅम्पियनशिप क्रमवारीत परेज ९७ गुणांसह सातव्या स्थानी असून हल्केनबर्ग (६६) नवव्या स्थानी आहे.
हॅमिल्टनची शानदार बाजी
By admin | Published: November 15, 2016 1:03 AM