नवी दिल्ली : इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सहाव्या सत्रात झालेल्या भ्रष्टाचार आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर टांगती तलवार आहे. मंगळवारी या दोन्ही संघांच्या भविष्याचा निकाल लागेल. सर्वाेच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय मंडळ या प्रकरणाचा निकाल जाहीर करेल. या दोन्ही संघांवर गंडांतराची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे अधिकारी आयपीएलच्या सामन्यांत सट्टेबाजी करताना दोषी आढळले होते. त्यामुळे हे संघ चौकशीनंतर मोठ्या संकटांना सामोरे जाणार आहेत. त्यांच्यावर बंदीचीही शक्यता आहे. या तपासात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष (आयसीसी)आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर गदा येऊ शकते. तसेच, न्यायालयाच्या त्रिसदस्यीय मंडळाचे प्रमुख व माजी न्यायाधीश राजेंद्रमल लोढा हे माजी चॅम्पियन असलेल्या संघाला मोठा दंडही ठोठावतील, असेही संकेत आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा आणि चेन्नई संघाचे प्रमुख तसेच श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन हे २०१३मधील आयपीएल सामन्यांत सट्टेबाजी प्रकरणात दोषी असल्याचे सांगितले होते. या निकालानंतर माजी न्यायाधीशांना या त्रिसदस्यीय समितीचे प्रमुख बनविण्यात आले होते. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते, की श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर कार्यरत राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. त्यानंतर श्रीनिवासन यांची या पदावरून हकालपट्टी झाली. श्रीनिवासन हे २०११पासून सलग ३ वर्षे मंडळाच्या अध्यक्षपदावर होते.
चेन्नई, राजस्थानवर टांगती तलवार
By admin | Published: July 14, 2015 2:59 AM