पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात सुवर्ण कामगिरीसह अर्शद नदीम पाकिस्तानचा नवा हिरो झालाय. पाकिस्तानला त्याने ऑलिम्पिकमधील वैयक्तिक तिसरे पदक मिळवून दिले. तेही गोल्ड. गत चॅम्पियन आणि भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला मागे टाकत त्याने ऑलिम्पिक रेकॉर्डसह गोल्ड मेडल पटकावले.
नीरज चोप्रासह पाक भालाफेकपटू अर्शद नदीमवरही सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. त्यात हरभजन सिंगचाही समावेश आहे. पण भज्जीला त्याच्या पोस्टवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. असं काय घडलं? हरभजन सिंगच काय चुकलं? तेच आपण जाणून घेणार आहोत.
नीरज-नदीमसंदर्भातील पोस्टमुळे हरभजन होतोय ट्रोल
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यात तगडी फाईट पाहायला मिळण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधी 9 वेळा हे दोघे प्रतिस्पर्धी होऊन एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. पण यावेळी प्रत्येक वेळी बाजी मारणारा नीरज चोप्रा कमी पडला. दुसरीकडे अर्शद नदीम याने संधीच सोनं करत इतिहास रचला.
भालाफेक क्रीडा प्रकारात दिसली आशियाची ताकद
याशिवाय भालाफेक इवेंटमधील सर्वात खास गोष्ट ही की, युरोपीयन खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकच्या पोडियमवर नदीम-नीरज जोडीनं आशियाई ताकद दाखवून दिली. माजी क्रिकेटर आणि वर्ल्ड चॅम्पियन हरभजन सिंग यानेही या दोघांच्या फोटोसह एक खास पोस्ट शेअर केलीये. पण त्यामुळे त्याला ट्रोलचा सामना करावा लागला आहे.
या गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी घेतली हरभजन सिंगची शाळा
हरभजन सिंग याने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यातील खिलाडूवृत्ती आणि दोघांच्यातील मैत्री याची खास झलक पाहायला मिळते. आपली मैत्री तुटायची नाही, या आशयाच्या कॅप्शनमुळेही ही पोस्ट लक्षवेधी ठरते. अर्शद नदीम याचे अभिनंदन करताना भज्जीनं म्हटलंय की, फोटो खूप सुंदर आहे. खेळात सर्वांना जोडून ठेवण्याची ताकद आहे. आता त्याचा हा मुद्दा योग्य आहे. फोटोही भारी आहे. पण भज्जीनं जी पोस्ट शेअर केलीये ती, नदीमच्या फेक अकाउंट प्राफाइलची आहे. तसा त्यात उल्लेखही आहे. त्यामुळेच हरभजन सिंगला नेटकरी ट्रोल करताना दिसते.
नीरजची सुवर्ण संधी हुकली; पाकला मिळाला गोल्ड बॉय
नीरज चोप्रा हा दुखापतीमुळे अनेक स्पर्धेला मुकला होता. हीच गोष्ट त्याच्या कामगिरीवरही परिणाम करणारी ठरली. त्यामुळेच त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92+ मीटर भाला फेकल्यावरही नीरजनं गोल्डची आशा सोडली नव्हती. खुद्द नीरजनेच ही गोष्ट बोलून दाखवली आहे. दुसरीकडे ऑलिम्पिक रेकॉर्डसह पाकला अर्शद नदीमच्या रुपात गोल्डन बॉय मिळाला आहे.