अनवी दिल्ली : आपल्या आईच्या नावे भज्जी स्पोर्ट्स ही कंपनी चालविणारा टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग दुटप्पी भूमिकेप्रकरणी (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट) अडचणीत येऊ शकतो. माहिती अधिकार कार्यकर्ते नीरज गुंडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी बीसीसीआयचे लोकपाल सेवानिवृत्त न्या. ए. पी. शाह करीत आहेत. शाह यांच्या चौकशीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याआधी भज्जीने कायदेशीर सल्ला घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. नीरजने लोकपाल कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत, स्थानिक संघांना पोशाख पुरविणाऱ्या भज्जी स्पोर्ट्सची मालकी हरभजनची आई अवतार कौर यांच्याकडे आहे. हरभजनला लोकपालांनी मेल पाठविला. यावर भज्जी म्हणतो, ‘‘मी कायदेशीर सल्ला घेत आहे. सल्ल्यानुसार काम करीन.’’बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा करताच हा अधिकारी म्हणाला, ‘‘भज्जी मालक नसेल तर मग कुणीही कंपनी चालवू शकतो. भज्जीचे नाव कुठे नसेल, तर दुटप्पी भूमिकेचा प्रश्नच उद्भवत नाही.’’दुसरीकडे, माजी कर्णधार सौरभ गांगुली याला लोकपालाकडून दिलासा मिळाला. गांगुली हा अॅटलिटिको डी कोलकाता फुटबॉल संघाचा मालक आहे. पुणे आयपीएल संघ खरेदी करणाऱ्या मालकांसोबत सौरभ जुळला असल्याचे प्रकाशित झाले. गांगुलीचा रायझिंग पुणे सुपरजायंट्सशी व्यावसायिक संबंध नसल्याने लोकपालांनी हे प्रकरण दुटप्पी नसल्याचे स्पष्ट केले. गांगुलीविरुद्ध दुटप्पी भूमिकेचे प्रकरण ठरत नसल्याने निकाली काढण्यात येत असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
हरभजनसिंग अडचणीत!
By admin | Published: February 19, 2016 2:56 AM