ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 साठी एकूण आठ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंगचा समावेश आहे. यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एक जून ते 18 जूनदरम्यान पार पडणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये हरभजन सिंग याच्यासोबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.
The #CT17 Ambassadors are raring to go! Comment below on who you are most looking forward to hearing from in the build up to #CT17? pic.twitter.com/X8SsvWHk5H— ICC (@ICC) April 12, 2017
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा पहिला चेंडू मैदानावर पडण्यासाठी बरोबर 50 दिवस बाकी असतानाच सदिच्छादूतांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. द ओवल मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश दरम्यान पहिला सामना पार पडणार आहे.
2002 चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारतीय संघात सहभागी असलेल्या हरभजन सिंगने आपण सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. "भारताने श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. एक क्रिकेटर म्हणून अशा महत्वाच्या इव्हेंटसाठी सदिच्छादूत म्हणून माझी नियुक्ती होणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे", अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली आहे.
आठ सदिच्छादूतांनी एकूण 1774 वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय 48 शतकांसह 51,906 धावा केल्या असून 838 विकेट्स घेतल्या आहेत. हे सर्व सदिच्छादूत चॅम्पिअन्स ट्रॉफी टूरचा भाग असतील. तसंच हे आठ क्रिकेटर्स आयसीसीच्या एडिटोरिअल टीमचाही सहभाग असतील.