ऑनलाइन लोकमत
थाटामाटात रंगलेल्या आयपीएलच्या पहिल्याच पर्वात हरभजन सिंग व एस.श्रीशांतमधील भांडणाने वाद निर्माण झाला. ऑस्ट्रेलिया दौ-यात सायमंड्स सोबत झालेल्या वादाने चर्चेत आलेला हरभजनने आयपीएलचे पहिले पर्वही गाजवले.
आयपीएल २००८ मध्ये पंजाब किंग्ज इलेवनने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आयपीएलमधील सलग तिसरा पराभव मुंबईचा काळजीवाहू कर्णधार हरभजन सिंगच्या पचनी पडला नाही. सामना संपल्यावर हरभजनने संतापाच्या भरात भर मैदानात श्रीशांतच्या कानाखाली वाजवली. याप्रसंगाचे फुटेज समोर आले नसले तरी हरभजनने मारल्यावर ढसाढसा रडणा-या श्रीशांतला सर्वांनीच बघितले होते. पैशांची पाऊस पाडणा-या आयपीएलमध्ये खेळ भावना हरवल्याचे या निमित्ताने दिसून आले. या प्रकाराची बीसीसीआयने गंभीर दखल घेत हरभजनला उर्वरित सामन्यांमधून निलंबित केले. याशिवाय पाच एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.