नवी दिल्ली: भारतीय हॉकी संघाचा बचाव फळीतील खेळाडू हरमनप्रीत याची शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एफआयएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
हरमन हा सलग दोन वर्षे हा किताब जिंकणारा चौथा खेळाडू ठरला. याआधी नेदरलँडचा तेयून डी नूजीयर, ऑस्ट्रेलियाचा जेमी ड्वेयर आणि बेल्जियमचा आर्थर वान डोरेन यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दोनदा जिंकला आहे. एफआयएचने निवेदनात म्हटले की, ‘हरमनप्रीत हा आधुनिक काळातील हॉकीचा सुपरस्टार आहे. तो शानदार बचाव करतो. प्रतिस्पर्धी खेळाडूला योग्यस्थळी रोखण्यासाठी क्षणार्धात योग्यवेळी पोहोचतो. त्याच्यात कमालीची क्षमता असल्याने अनेकदा गोलदेखील नोंदवितो.’
२६ वर्षांच्या हरमनला २९.४ गुण मिळाले. या शर्यतीत हरमनने थिएरी ब्रिंकमॅन के २३.६ आणि टॉम बून २३.४ यांना मागे टाकले. भारताचा उपकर्णधार असलेल्या हरमनने एफआयएच प्रो लीग हॉकी २०२१-२२ ला १६ सामन्यांत १८ गोल केले असून त्यात दोन हॅट्ट्रिकचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"