ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 21 - अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत आता भारताचा इंग्लंडबरोबर सामना होणार आहे.
आज झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 36 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफान खेळी केली. दरम्यान, या सामन्यात भारताने दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. ठराविक धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले. फलंदाज अॅलेक्स ब्लॅकवेलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. मात्र, ती अपयशी ठरली. तर, संघाची कर्णधार मेग लेनिग अवघ्या शून्य धावेवर तंबूत परतली. तर, अॅलेक्स ब्लॅकवेल हिने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या फळीतील फलंदाजी लवकर ढासळली. अॅलिस विलानीने 75 धावा केल्या. निकोल बोल्टन (14), अॅलिस पेरी (38), बेथ मूनी (1), अॅश्ले गार्डनर (1), जेस जोनासेन (1), मेगान शट (2) आणि ख्रिस्टीन बीम्स नाबाद 11 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 40.1 षटकात 245 धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत 42 षटकात 4 बाद 281 धावा केला होत्या. भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरने हिने धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफानी खेळी केली. तर, स्मृती मंधना (6) आणि पूनम राऊत (14) हे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार मिताली राज (36) व हरमनप्रीत यांनी डाव सावरला. दिप्ती शर्माने 25 आणि वेदा कृष्णामूर्तीने नाबाद 16 धावांची खेळी केली.
भारताकडून गोलंदाज दिप्ती शर्मा, झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. तर, ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज अॅलिस विलानी, ख्रिस्टीन बीम्स, अॅश्ले गार्डनर आणि मेगान शट यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.