धर्मशाला : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर यावर्षी डिसेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) ट्वेंटी-२0 स्पर्धेत सिडनी थंडर्स संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेत खेळणारी ती पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी येथे बोर्डाच्या बैठकीच्या अखेरच्या दिवशी हरमनप्रीतने सिडनी थंडर्ससोबत करार करण्याविषयी दुजोरा दिला. बीसीसीआयने गेल्या महिन्यात परदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी भारतीय महिला खेळाडूंना परवानगी दिली होती. मंडळाच्या या निर्णयानंतर हरमनप्रीत ही परदेशातील लीगशी जुळली गेलेली पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.अष्टपैलू हरमनप्रीत कौरला बिग बॅशमध्ये अनेक संघांनी आपल्या संघात समावेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात लीगच्या पहिल्या पर्वातील विजेता संघ सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात हरमनप्रीतला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस होती.भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत, त्यात हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे. आपण भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीलादेखील बिग बॅशमध्ये खेळताना पाहू इच्छितो, असे पहिल्या पर्वातील विजेता संघ सिडनी थंडर्सची कर्णधार अॅलेक्स ब्लॅकवेलने म्हटले होते. आमच्या संघात एका परदेशी खेळाडूची जागा आहे आणि ती जागा हरमनप्रीत कौर भरून काढू शकते, असे एलिस पेरीनेदेखील म्हटले होते. (वृत्तसंस्था)
हरमनप्रीत खेळणार बिग बॅश लीगमध्ये
By admin | Published: June 25, 2016 2:45 AM